

आष्टी, पुढारी वृत्तसेवाः भीमराव धोंडे यांना आष्टी विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळाली तर मी बिनशर्त माघार घेऊन धोंडे यांचा प्रचार करणार असे आ. बाळासाहेब आजबे म्हणाले. या वक्तव्यामुळे आष्टीत महायुतीचा उमेदवार धस, धोंडे की? असे प्रश्न चर्चिले जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आ. बाळासाहेब आजबे यांनी एका कार्यक्रमात केलेले विधान चांगलेच चर्चेत आहे. त्यांच्या वक्तव्यातून आष्टीच्या उमेदवारीसाठी अफाट रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महायुतीतील प्रचलीत नियमानुसार विद्यमान आमदार असलेल्या आजबे यांना राष्ट्रवादी अजीत गटाची उमेदवारी मिळणे अपेक्षीत आहे. या परिस्थितीत आजबे यांनी थेट सुरेस धस यांच्या उमेदवारीला विरोध करत महायुतीची भिमराव धोंडे यांना उमेदवारी मिळाली तर आष्टी मतदारसंघात त्यांना माझा बिनशर्त पाठींबा आहे, असे वक्तव्य केले. तसेच धोंडेंना उमेदवारी भेटल्यास उघडपणे त्यांचा प्रचार करणार असल्याचे सांगीतले. या प्रकाराने विद्यमान आमदार आजबे यांची उमेदवारी धोक्यात आहे की काय? अशी चर्चा होत आहे... विशेष म्हणजे एका जागेसाठी तिघेजन अडून बसलल्याने आष्टीचा उमेदवार कोण? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आष्टीत महायुतीची उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजीत पवार गट) विद्यमान आ. बाळासाहेब आजबे, भाजपाचे माजी मंत्री सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे या तीन दिग्गज नेत्यांमध्ये प्रचंड स्पर्धा लागली आहे. यामुळे महायुतीपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. सोमवारी विद्यमान आमदारांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार करण्याचे जाहीर केल्याने मतदारसंघात नवीन चर्चेला उधाण आले आहे.