

Suleman Devola Gram Panchayat office vandalism
कडा: आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे शुक्रवारी (दि. १४) रात्री ग्रामपंचायत कार्यालयात धक्कादायक तोडफोडीची घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने हातात कुऱ्हाड घेऊन ग्रामपंचायतीचे कुलूप फोडत आत शिरून महत्त्वाचे दस्तऐवज पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. या आगीत ४० ते ५० रजिस्टर तसेच अनेक महत्वाच्या फाईल्स जळून पूर्णतः नष्ट झाल्या आहेत.
काळोख्या रात्री घडला संपूर्ण प्रकार
गावकऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपीने मध्यरात्रीच्या सुमारास कार्यालयाचे दार तोडून आत प्रवेश केला. कागदपत्रे अस्ताव्यस्त फेकून देत काही दस्तऐवजांना आग लावण्यात आली. धूर व जळालेल्या कागदांचा ढिगारा पाहून सकाळी गावकऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी त्र्यंबक मुळीक यांना माहिती दिली.
घटनास्थळी नुकसानीचा पंचनामा
घटनेनंतर ग्रामविकास अधिकारी त्र्यंबक मुळीक, सरपंच दादा यदु घोडके, अतुल पोपट घोडके, भिमराव भादवे, सचिन खोरदे, नवनाथ व एकनाथ भोजे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मुळीक यांनी सांगितले की, घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही घटना कोणामुळे व कोणत्या हेतूने घडवून आणली याबाबत पोलीस तपास सुरू आहे. या आगीनंतर ग्रामपंचायतीतील अनेक संवेदनशील कागदपत्रांचे नुकसान झाल्याने गावात भीतीचे सावट पसरले आहे.
मागील तीन वर्षांपासून ग्रामसभा न झाल्याने लोकांच्या मनात नाराजी वाढली आहे. कदाचित त्याच संतापातून हा प्रकार घडला असावा.
- परमेश्वर घोडके, समाजसेवक