

Ashti missing woman found
आष्टी : तालुक्यातील पांढरी गावातील चंद्रकला संदीप सपकाळ (वय 30) ही महिला 13 नोव्हेंबर रोजी आपल्या दोन लहान मुलांसह साई (वय 2) आणि रेवन (वय 1 ) पुण्याकडे जाण्यासाठी आष्टी बस स्थानकात आली होती. मात्र, तब्येत बिघडल्याने ती चुकीच्या बसमध्ये बसली आणि अनवधानाने पाटोदा तालुक्यातील जालिंद्रनाथ गड परिसर व येवलेवाडी भागात पोहोचली.
दरम्यान, तिचा आणि मुलांचा ठावठिकाणा लागेना, त्यामुळे घरच्यांनी आष्टी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. ही घटना गंभीर मानून आष्टी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद भुतेकर यांनी या शोधमोहीमेची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल गणेश राऊत यांच्याकडे सोपवली.
राऊत यांनी तत्काळ आष्टी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली. फुटेजमधून महिलेची हालचाल ओळखून त्यांनी तिचा मागोवा घेतला आणि अवघ्या 24 तासांच्या आत चंद्रकला सपकाळ आणि त्यांच्या दोन मुलांचा शोध लावण्यात यश मिळवले. यानंतर त्यांनी तत्काळ आई आणि दोन्ही मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या पती व घरच्यांच्या स्वाधीन केले.
हेड कॉन्स्टेबल गणेश राऊत यांच्या या कर्तव्यपर, संवेदनशील आणि तातडीच्या कामगिरीबद्दल पांढरी गावचे सरपंच सुधीर पठाडे आणि गावकऱ्यांनी त्यांचा विशेष सत्कार केला. सदर महिला आपल्या कुटुंबासह सुरक्षित असून पुढील प्रवासासाठी तिला पुण्याकडे रवाना करण्यात आले आहे.