कडा : आष्टी तालुक्यातील शेरी फाटा येथे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘आमच्या दाजीला शिवीगाळ का केली?’ असे म्हणत ७ ते ८ अज्ञात जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.१) रात्री घडली. मारहाणीदरम्यान एका व्यक्तीने दगडाने डोक्यात वार केल्याने प्रसिद्ध लिंबू व्यापारी अक्षय महाडिक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कडा येथील हारकर हॉस्पिटलच्या मध्ये उपचार सुरू आहेत.
फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, शेरी फाटा येथील अंबिका लॉजसमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास अक्षय महाडीक जेवण्यासाठी आले होते. जेवण करून पैसे दिल्यानंतर ते हॉटेलमधून बाहेर पडत असताना तेथे उपस्थित असलेल्या ७ ते ८ अज्ञात जणांपैकी एकाने त्यांना आवाज देऊन परत बोलावले.
‘आमच्या दाजीला शिवीगाळ का करतो?’ असे म्हणत संबंधित व्यक्तीने अक्षय यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी अक्षय यांना हॉटेल समोर नेऊन मारहाण केली. हॉटेल मालकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही शिवीगाळ करून ‘तू मध्ये येऊ नकोस’,अशी धमकी देण्यात आली.
यानंतर अक्षय यांना ओढत हॉटेलच्या पाठीमागे नेण्यात आले. तेथे त्यांना लाथाबुक्क्यांनी व चापटांनी मारहाण करण्यात आली. याचवेळी एका व्यक्तीने बाजूला पडलेला दगड उचलून अक्षय यांच्या डोक्यात मारल्याने गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. मारहाणीनंतर ‘पुन्हा आमच्या दाजीला शिवीगाळ केलीस तर तुला जिवे मारून टाकू,’ अशी धमकी देत हल्लेखोर तेथून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
जखमी अक्षय महाडिक यांना अंकुश नवले व नवनाथ धर्माधिकारी यांनी तातडीने कडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
७ ते ८ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात ७ ते ८ अज्ञात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार भाऊसाहेब आसाराम आहेर करीत असून, परीक्षाधीन उपअधिक्षक भारत पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.