

कडा: शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरी, घरफोड्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी वाढू लागली आहे. पोलिस प्रशासनाने देखील यासाठी पुढाकार घेत नागरिकांना घर,दुकान,सोसायटी व रस्त्यांवर कॅमेरे बसवण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी तपासासाठी सीसीटीव्ही फुटेजच महत्वाचे पुरावे ठरतात. असे असताना आष्टी तालुक्यातील राघापूर येथील लक्ष्मण बबन शेंडगे (वय ३३) यांच्या मालकीच्या बेलगाव रोडवरील हॉटेलमध्ये चोरीची घटना घडली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरासह ४२,३०० किमतीचा विविध इलेक्ट्रॉनिक व घरगुती साहित्याचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे ९.०० वाजता लक्ष्मण शेंडगे यांनी आपले हॉटेल बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वाजता, त्यांनी हॉटेल उघडले असता मागील दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले. आत पाहिले असता हॉटेल मधील अनेक वस्तू चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी हॉटेलमधून खालील साहित्य चोरून नेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संदीप रामचंद्र सानप तपास करत आहेत.आष्टी तालुक्यात चोरीच्या घटना वाढत असून पोलीस प्रशासनाने चोरांच्या मुसक्या आवळाव्यात,अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.