

Mudgegaon wall collapse two injured
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील मुडेगाव येथे एका घराची भिंत कोसळून दोघेजण जखमी झाले आहेत. जखमी मध्ये एक महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. संदीपान अडसूळ, शेषाबाई जगताप अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुडेगाव येथे अंबाबाईचे मंदिर आहे. याच मंदिरात दर्शनासाठी संदीपान अडसूळ आणि शेशाबाई जगताप हे दोन गावकरी दर्शनासाठी जात होते. वाटेतच एक बंद अवस्थेत असलेले दगडी बांधकाम असलेले जुने घर आहे. मागील काही दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यात पावसाची संततधार चालू आहे. दररोज पडणाऱ्या पावसाने दगडी बांधकाम असलेले घर कोसळल्या गेले. घराच्या बाजूने जात असताना या घराच्या भिंतीखाली संदीपान अडसूळ हे दबल्या गेले तर शेशाबाई जगताप यांच्या पायावर दगड पडल्याने त्यांच्या पायाला दुखापत झाली.
भिंतीखाली दबल्या गेलेले संदीपान अडसूळ हे कमरेपासून खाली भिंतीखाली दबल्या गेले. त्यांच्या अंगावर पडलेले दगड काढताना त्यांना अक्षरशः ओढून काढावे लागले. त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, शेषाबाई जगताप यांना जवळच असलेल्या धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करन त्यांच्या पायाला तीन ते पाच टाके घालून त्यांना घरी पाठवण्यात आले. दरम्यान अंबाजोगाई तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झाले असून अनेकांची पिके तसेच शेतातील माती वाहून गेली आहे.