

Ambajogai Drought Crisis
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील शेतकरी अंकुश रंगनाथ गंगणे (वय ६४) यांनी नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना गुरूवारी (दि. १५) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अंकुश गंगणे यांच्या नावावर केवळ एक हेक्टर शेती होती. ही शेती माळरानावर असल्याने कमी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला. पावसाअभावी आणि वाढत्या उन्हामुळे शेतातील पिके करपून गेली. परिणामी, हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता मावळल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट निर्माण झाले होते.
सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक गणित कोलमडल्याने गंगणे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (स्वाराती) पाठविण्यात आला. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खोकले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अंकुश गंगणे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.