बीड : अंबाजोगाईत ६३ चोरीच्या मोबाईलासह कार जप्त

सुट्टीवर आलेल्या कर्तव्यदक्ष पोलिसाने लावला चोरीचा छडा
Beed theft News
अंबाजोगाईत ६३ चोरीच्या मोबाईलासह कार जप्त
Published on
Updated on

अंबाजोगाई : साप्ताहिक सुट्टी असल्याने बीडहून अंबाजोगाईला आलेले पोलीस कर्मचारी तेजस वाहुळे यांना बस स्थानकात एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर कारमध्ये निघालेल्या त्या चोरट्याचा पाठलाग करून वाहुळे यांनी त्यास पकडले असता त्याच्याजवळ चोरीचे तब्बल ६३ मोबाईल आढळून आले. यावेळी त्या चोरट्याचे तिघे साथीदार मात्र पलायन करण्यात यशस्वी झाले. ही घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी अंबाजोगाई शहरात घडली.

तेजस वाहुळे सध्या बीड पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. साप्ताहिक सुटी असल्याने ते अंबाजोगाईत आले होते. यादरम्यान ते बस स्थानकात थांबले असता एका तरुणाच्या हालचाली त्यांना संशयास्पद वाटल्या. त्यानंतर तो तरूण स्थानकाबाहेर पडला व रस्त्यावर थांबलेल्या एका कारमध्ये बसलेल्या तीन साथीदारांसह लगबगीने निघाला. वाहुळे यांनी तत्काळ एका ऑटोरिक्षातून त्या कारचा पाठलाग सुरु केला. आपल्या पाळतीवर कोणी येत असल्याची अजिबात कल्पना नसलेल्या त्या चोरट्यांनी कार भगवानबाबा चौकातील पंपावर सीएनजी भरण्यासाठी थांबवली.

यावेळी तिघेजण खाली उतरले तर एकजण कार जवळच थांबला. पाठलाग करत आलेल्या वाहुळे यांनी कारजवळ थांबलेल्या चोरट्यास पकडले आणि चौकशी सुरु केली. यावेळी त्याच्यासोबतचे तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीसी खाक्या दाखवताच त्या चोरट्याने तो नागपूरचा असून सोबतचे तिघे साथीदार झारखंडचे असल्याचे सांगून आता बस स्थानकातून एक मोबाईल चोरला असल्याचे कबूल केले. त्यानंतर वाहुळे यांनी कारची झडती घेतली असता आतमध्ये तब्बल ६३ मोबाईल आढळून आले. वाहुळे यांनी मोबाईल आणि कारसह त्या चोरट्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या कामगिरीबद्दल तेजस वाहुळे यांचे कौतुक होत आहे.

सहा आयफोनचा समावेश

दरम्यान, जप्त केलेल्या ६३ मोबाईलमध्ये सहा आयफोनचा समावेश आहे. हे मोबाईल ट्रेस होऊ नयेत, म्हणून चोरट्यांनी त्याला चांदीच्या आवरणात गुंडाळले होते. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news