

उदय नागरगोजे
बीड : बीड ते अहिल्यानगर मार्गावर सौताड्यापर्यंत ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरु आहे. काम वेगवेगळ्या टप्प्यात सुरु असल्याने आवश्यक त्या ठिकाणी सूचनाफलक, बॅरिकेडींग, रिफ्लेक्टर लावण्याची गरज असतांना कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तीन तरुणांना प्राण गमवावे लागले आहेत. यामुळे आता या अपघाताच्या प्रकरणात कंत्राटदारावरच गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
बीड ते अहिल्यानगर मार्गावर बीड ते सौताड्यापर्यंतचे काम गेल्या दिड ते दोन वर्षांपासून सुरु आहे. या अंतरात वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे काम संबंधीत कंत्राटादाराकडून केले जात आहेत. रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आलेले असतांना अनेक ठिकाणी पुलांचे काम मात्र बाकी आहेत. एका बाजुचा पूल पूर्ण तर दुसर्या बाजुचे सुरु अथवा दोन्ही बाजुचे गार्डचे काम बाकी आहेत.
बीडजवळच उकंडा तलावाच्या परिसरात देखील पुलाचे काम सुरु असून त्या ठिकाणी एका बाजुचा स्लॅब टाकण्यात आला आहे तर दुसर्या बाजुचा स्लॅब अद्याप बाकी आहे. यामुळे या ठिकाणी एकाच बाजुने वाहतूक सुरु आहे तर दुसर्या बाजुला मातीचा भराव टाकण्यात आलेला आहे. या ठिकाणी काम सुरु असल्याने दोन्ही बाजुला रिफ्लेक्टर्स सह सूचना फलक लावण्याची गरज होती, परंतु तशी कोणतीही उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती.
गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता या मार्गावरुन जाणार्या दुचाकीला टँकरने याच पुलावर धडक दिली, यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरातील ग्रामस्थांनी कंत्राटदारावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. रस्त्याचे काम करतांना साधा सूचनाफलकही लावला गेला नसल्यानेच या तरुणांना आपले प्राण गमवावे लागले.
दीड वर्षात अनेक अपघात
बीड ते सौताडा घाटादरम्यान रस्त्याचे काम सुरु असतांना सुरक्षा नियमांच्या पालनाबाबत उदासिनता दिसून येत आहे. एकसलग काम न करता सोयीप्रमाणे या रस्त्याचे काम संबंधीत कंत्राटदाराने केले आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना देखील केल्या गेल्या नाहीत. या रस्त्याचे काम सुरु असतांना अनेक दुचाकीचालक स्लीप होवून पडल्याच्या घटना देखील घडल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात अशी मागणी संबंधीत अभियंत्यांकडे देखील करण्यात आल्या होत्या, परंतु त्यांनी देखील त्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, परिणामी ऐन तारुण्यात तिघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
कंत्राटदाराचे दुर्लक्ष; अभियंता उदासीन
बीड ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बीड ते सौताडादरम्यान रस्त्याचे काम गेल्या दिड वर्षांपासून सुरु आहे. आता काम अंतिम टप्प्यात आल्याने या कंत्राटदाराने सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केले आहे तर अभियंता उबाळे यांचे देखील उदासिन धोरण पहायला मिळत आहे. रस्त्यावरील अपघाताबाबत व सुरक्षा उपायांबाबत संबंधीत कंत्राटदाराला त्यांनी काय निर्देश दिले आहेत ? याबाबत माहिती घेण्याकरिता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही, यामुळे प्रशासकीय बाजु समजू शकली नाही. अभियंता उबाळे व संबंधीत कंत्राटदाराने आता तरी आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.