

केज : अंबाजोगाई रस्त्यावर ढाकेफळ शिवारातील हॉटेल कारभारी समोर भरधाव कारने दुचाकीला जोराची धडक दिलेल्या या अपघातात दुचाकीवरील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) केज तालुका उपप्रमुख चंद्रकांत शहाजी इंगळे (वय ५० रा. सादोळा) हे जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि. १) सायंकाळी सहा वाजता घडली.
सादोळा (ता. केज) येथील चंद्रकांत शहाजी इंगळे (वय ५०) हे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) केज तालुका उपप्रमुख होते. ते रविवारी पिसेगाव येथे रेणुका देवीच्या यात्रेत दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन पिसेगाव येथून परत सादोळा या गावी दुचाकीवरून (एम. एच. ४४ एसी ६९३१) निघाले होते.
केज - अंबाजोगाई रस्त्यावर ढाकेफळ शिवारातील कारभारी हॉटेलसमोर अंबाजोगाई येथून अहिल्यानगरकडे जात असलेल्या भरधाव कारने (एम. एच. १६ डीसी ८८४७) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात चंद्रकांत इंगळे हे जागीच ठार झाले. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भावजयी, दोन पुतणे असा परिवार आहे.
दहा वर्षांपूर्वी त्यांच्या भावाचा अपघातात मृत्यू
दहा वर्षांपूर्वी झालेल्या दुचाकीच्या अपघातातच चंद्रकांत इंगळे यांचा भाऊ शिवशंकर शहाजी इंगळे यांचा मृत्यू झाला होता. रविवारी चंद्रकांत इंगळे यांचा ही अपघातातच मृत्यू झाला.