

गेवराई : गेवराई तालुका शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन, सेवानिवृत्त जिल्हा परिषद मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, गणित विषयाचे तज्ज्ञ तथा माजी नगर परिषद सभापती नारायणराव सुंदरराव मोटे यांचे शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात निधन झाले. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून नातेवाईकांच्या लग्न समारंभास हजेरी लावल्यानंतर घरी परतत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. दत्त पार्क परिसरात त्याच्या दुचाकीला जीपने धडक दिल्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने गेवराई शहरासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
नारायणराव मोटे हे गेवराई शहरातील मोटे गल्ली येथील रहिवासी होते. शनिवारी शिक्षक दिनानिमित्त गेवराई येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी नातेवाईकांच्या लग्न समारंभास हजेरी लावली. त्यानंतर ते दुचाकीवरून दत्त पार्क परिसरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरून ते दुचाकीवरून घराकडे परतत असताना छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या एका जीपने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या अपघातात नारायणराव मोटे यांच्या डोक्यासह शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने गेवराई येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी ९ वाजता गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान
नारायणराव मोटे यांनी प्रदीर्घ काळ शिक्षण क्षेत्रात सेवा बजावताना आदर्श शिक्षक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. गणित विषयाचे तज्ज्ञ म्हणून विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लावण्यासोबतच शिस्त, संस्कार आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले. जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली.
तसेच गेवराई तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी शिक्षकांच्या हितासाठी काम केले. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. गेवराई नगर परिषदेचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या निधनाने गेवराईतील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. नारायणराव मोटे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे आणि तीन मुली असा परिवार आहे.