

गौतम बचुटे
केज : केज-अंबाजोगाई रोडवर माऊली जिनिंगसमोर एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. कारचालकाने चुकीच्या बाजूने (राँग साईड) येऊन दिलेल्या या धडकेत दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
दिनांक १९ मार्च रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रवि गोदाम आणि सतीश कसबे (दोघेही रा. परळी, जि. बीड) हे केज येथे सेंट्रिंगचे काम आटोपून आपल्या दुचाकीने (क्र. MH-23 BL-5053) परळीकडे जात होते. केज उपजिल्हा रुग्णालयाजवळील माऊली जिनिंगसमोर आले असता, समोरून येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या 'बलेनो' कारने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला भीषण धडक दिली.
या अपघातात दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर प्रथमतः अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, रवि गोदाम याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.
अपघात आणि पळ काढणारा चालक: कारचालकाने अत्यंत निष्काळजीपणे वाहन चालवून हा अपघात घडवला. धडक दिल्यानंतर जखमींना मदत करण्याऐवजी चालक कारसह तेथून पळून गेला आहे.