

केज : पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सौरभ श्रीराम राठोड वय (१७ वर्ष) आणि त्याचा मित्र यश धनवटे यांच्यावर कोयत्याने जीवघेणा खुनी हल्ला करून मोटार सायकली वरून पळून जात असलेले कोयता गँगच्या सात हल्लेखोरांना केज पोलिसांनी मस्साजोग जवळील पेट्रोल पंपाजवळ सिने स्टाईलने पाठलाग करून पकडले. तसेच त्यांच्या तीन मोटार सायकली ताब्यात घेतल्या. ते सर्व आरोपी आणि मोटार सायकली रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या.
या बाबतची माहिती अशी की, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी संपर्क साधून कळविले होते की, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून ओंकार देशमुख आणि त्याचे साथीदार गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओम चव्हाण, रोहन गाडे आणि एकजण यांनी शिक्षण घेत असलेला सौरभ राठोड वय (१७ वर्ष) आणि त्याचा मित्र यश धनवटे यांच्यावर कोयत्याने जीवघेणा खुनी हल्ला करून मोटार सायकली वरून पळून जात आहेत. माहिती मिळताच दि. २४ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वा. च्या सुमारास पोलीस निरीक्षक वैभव पाटील तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव, पोलीस नाईक गोरख फड, पोलीस नाईक चंद्रकांत काळ कुटे, बाळासाहेब अहंकारे, प्रकाश मुंडे हे मस्साजोग येथील पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून दबा धरून बसले होते.
सायंकाळी ५:३० वा. च्या सुमारास त्यांना तीन मोटार सायकलवर ओंकार देशमुख आणि त्याचे साथीदार गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओम चव्हाण, रोहन गाडे आणि एकजण असे सातजण येत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करताच ते हल्लेखोर मोटार सायकली सोडून शेतात पळून जावू लागले. त्या नंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्या सात जनांसह तीन मोटार सायकली ताब्यात घेतल्या. त्या नंतर रांजणगाव पोलिसांशी संपर्क साधून दि. २५ मार्च रोजी आरोपी आणि त्यांच्या मोटार सायकली रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत.