

Beed baby alive after declared dead in Ambajogai
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात (एसआरटी) प्रसूती झालेल्या एका महिलेचे बाळ मृत झाल्याचे तेथील बालरोग विभागातील डॉक्टरांनी सांगितले. तेथील कर्मचाऱ्यांनी ते बाळ कपड्यामध्ये गुंडाळून बाजूला ठेवून दिले... कुटुंबीयांनी त्याचे अंत्यसंस्कार गावाकडे करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला गावी घेऊन आले पण त्याचे दैवच बलवत्तर म्हणावे.. अंत्यसंस्कारापूर्वी ते बाळ रडू लागले... यानंतर कुटुंबीयांनी त्याला पुन्हा एसआरटी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शासकीय रुग्णालयातील निष्काळजीपणाचा फटका एखाद्याच्या जीवावर कसा बेतू शकतो, त्यातून काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? याचा अनुभव केज तालुक्यातील होळ येथील एका कुटुंबाने घेतला. अंबाज-ोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील प्रसूती विभागात केज तालुक्यातील एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. सोमवारी रात्री त्या महिलेची प्रसूती झाली, परंतु बाळाची प्रकृती नाजूक असल्याने बालरोग विभागातील डॉक्टरांना तपासणीसाठी बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी करत सदर बाळ मृत झाल्याचे कुटुंबीयांना सांगितले. हा कुटुंबासाठी धक्काच होता. परंतु नियतीपुढे कोणाचे काय चालते म्हणत त्यांनी त्या बाळाचे अंत्यसंस्कार गावी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार सकाळी त्या कुटुंबीयांनी बाळाला घेऊन गाव गाठले. त्या ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच बाळ रडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून कुटुंबीयांनी तातडीने ते बाळ घेऊन पुन्हा अंबाजोगाईचे रुग्णालय गाठले व डॉक्टरांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने त्या बालकावर तातडीने उपचार सुरू केले. तसेच या सर्व प्रकारास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होताच सारवासारव सुरू केली. या प्रकरणात अद्याप अधिकृत तक्रार करण्यात आलेली नाही. आता रुग्णालय प्रशासनाकडून अंतर्गत कारवाई केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एखाद्या बालकाच्या व त्या कुटुंबाच्या आयुष्याशीच हा खेळ खेळला गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत असून संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
सदरचे बाळ हे २७आठवड्यातच जन्माला आ-लेले होते. तपासणीवेळी रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यामुळे ते बाळ नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. कमी कालावधीत प्रसूती झाल्यास असा प्रकार होऊ शकतो, असे काहीजणांचे म्हणणे असले तरी हे मिरॅकल होते की निष्काळजीपणा? तो कोणी केला? याचा शोध घेतला जावा, अशी मागणी केली जात.