

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव मतदार संघ भाजपचा गड आहे. पूर्वापार आम्ही भाजपाचे काम करत आहोत. परंतु महायुतीच्या प्रयोगात ही जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे. परंतु येथील मतदार हा भाजपाला पोषक असल्याने मी तिकिटासाठी पक्ष श्रेष्ठींकडे मागणी करणार आहे. तिकीट नाही दिले तरी जनतेच्या पाठिंब्याने विधान सभेच्या मैदानात उतरणार असे मनोगत बाबरी मुंडे यांनी व्यक्त केले.
माजलगाव शहरात गुरुवार दि.३ रोजी बाबरी मुंडे संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याबाबत पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही भाजपाचे काम करत आहोत. बीड जिल्हा हा भाजपाचा गड आहे. येथील मतदार मोठ्या प्रमाणात भाजपाला मानणारा आहे.
परंतु राज्यात, जिल्ह्यात राजकीय परिस्थिती बदलली आहे. महायुतीचा प्रयोग झाल्याने अनेक मतदारसंघात उलथापालथ झाली आहे. माजलगाव मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. परंतु ही बाब भाजप मतदाराला आवडल्यासारखी दिसत नाही. त्यामुळे भाजपाचे मतदान राष्ट्रवादीला पडण्याची सुतराम शक्यता नाही. परंतु असे असले तरी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून माजलगाव विधानसभेसाठी पुढे सरसावले आहेत. यात भाजपाला विरोध करणारेही आहेत. परंतु भाजपाचा मतदार त्यांना मतदान करणार नाही,
यामुळे भाजपाकडे रीतसर तिकिटाची मागणी करत मी विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे. पक्षाने तिकीट नाही दिले तर अपक्ष निवडणूक लढवणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान बाबरी मुंडेंच्या अपक्ष लढण्याच्या तयारी मुळे येथील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा आहे. बाबरी मुंडे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार करत शहरात सुरू केलेल्या बाबरी मुंडे संपर्क कार्यालयाचे उद्घाटनाला भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रकाश आनंदगावकर, नपचे माजी नगराध्यक्ष अशोक तिडके, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संजीवनी राऊत, यांच्यासह अनेक भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
माजलगावची जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे. यामुळे येतील भाजपाचा पदाधिकारी कार्यकर्ता मतदार हवालदिल झाला आहे. यातच राष्ट्रवादीचेच काही बंडखोर पालकमंत्री धनंजय मुंडे व आ. पंकजा मुंडे यांचे फोटो लावून मतदार संघात फिरत आहेत. अशा स्थितीत बाबरी मुंडे यांची माजलगाव मतदार संघात भाजपाकडे तिकिटाची मागणी; अपक्ष लढण्याची घोषणा करत केलेली एन्ट्री कोणाचं 'निर्मळ' वातावरण 'गढूळ' करणार याची उत्सुकता आहे.