

Attempt to set a young man on fire after beating him up and dousing him with diesel.
बीड, पुढारी वृत्तसेवा येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण करून नंतर अंगावर डिझेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात दोघे जण जखमी झाले असून नंतर या प्रकरणाला धार्मिक वादाचे रूप देऊन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे यांच्या तत्परतेमुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरात तीन आरोपींना अटक करण्यात आल्याने गावातील तणाव निवळला होता.
बीडच्या ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७मे रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास खामगाव येथील फरांडे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू होते. फिर्यादी शाहरुख रहिमान पठाण हे जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील खडी पांगवत असताना आरोपी प्रल्हाद केशव भावले हा ट्रॅक्टर घेऊन त्या रस्त्याने जात होता.
यावेळी जेसीबी मशीन आडवी का लावली या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढत असताना आरोपी प्रल्हाद भावले याने तांब्याच्या साहाय्याने शाहरुख पठाण यांना मारहाण केली तसेच धार्मिक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यानंतर आरोपीने डिझेलच्या कॅनमधील डिझेल फिर्यादीच्या अंगावर टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेत शेख फैजान करीम हाही जखमी झाला आहे.
जखमी शाहरुख पठाण यांच्यावर लोटस हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रल्हाद केशव भावले, सोमदेव भावले व केशव भावले या तिघांना ग्रामीण पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
दरम्यान, काही समाजकंटकांनी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनी बाळराजे दराडे व पोलिस पथकाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कावत, पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलिस हवालदार प्रसाद कदम, विजय जाधव, सतीश मुंडे, युवराज चव्हाण यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस बाळराजे दराडे हे करीत आहेत.