

बीड : माजलगाव तालुक्यात ओबीसी कार्यकर्ता पवन करवर याच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, करवर याच्यावर हल्ला करणारे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचेच कार्यकर्ते आहेत. यासंबंधी आरोपींचे फोटो तसेच सोशल मीडियावरील पोस्ट्स पुराव्यांमध्ये आहेत.
प्राध्यापक हाके यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी फेसबुकवर पोस्ट केली होती, ज्यामध्ये विजयसिंह पंडित यांना उद्देशून "मला काम देऊ नका, परंतु हाके याला ठोकायची परवानगी द्या" असे म्हटले होते.
या प्रकरणाच्या तात्काळ कारवाईसाठी प्राध्यापक हाके यांनी बुधवारी बीडमध्ये पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आणि आमदार पंडित यांच्या कार्यकर्त्यांशी संबंधित पुरावे पोलिसांना दिले.
माध्यमांशी संवादात प्राध्यापक हाके म्हणाले की, "ओबीसी आरक्षण बचाव चळवळीला नष्ट करण्यासाठी हे सर्व हल्ले केले जात आहेत. माझ्यावर सात ते आठ वेळा हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मी बीड दौऱ्यावर असताना माझ्या आणि पोलिस गाडीच्या मध्ये एक फॉर्च्यूनर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. त्या गाडीचा नंबर आम्ही पोलिसांना दिला आहे. करवर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा एक हात, एक पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि डोक्यातही मार लागला आहे."
हाके यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. तसेच, जर आरोपींना अटक झाली नाही, तर ते बीड पोलिस अधीक्षक कार्यालयावर आणि माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याचे इशारा दिला आहे.