

केज : आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत गाणे वाजविण्यावरून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना केज तालुक्यात घडली. त्यानंतर त्या गावगुंडाविरूद्धात गुन्हा दाखल करा, अन्यथा मिरवणूक पुढे नेणार नाही, असे म्हणत आंबेडकरवादी समर्थकांनी आक्रमक प्रवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अजय दत्तू ढोरे या गावगुंडाला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, २९ एप्रिल रोजी केज तालुक्यातील कुंबेफळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. ही मिरवणूक आंबेडकर चौकाजवळ आली असता अजय ढोरे हा त्या ठिकाणी आला व त्याने दुसरे गाणे लावा, मला नाचायचे आहे, असे मिरवणुकीतील तरूणांना म्हटले. त्याला तरूणांनी विरोध दर्शविला असता त्याने जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे संतप्त तरूणांनी मिरवणूक थांबविली आणि जोपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मिरवणूक पुढे नेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.
दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी त्यांचे सहकारी बसवेश्वर चेनाशेट्टी यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. त्यानंतर पोलिसांनी अजय ढोरे याला ताब्यात घेत तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली. ढोरे यांच्यावर युसुफवडगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.