

आष्टी : बीड-अहिल्यानगर राज्य महामार्गावर शुक्रवारी सकाळी घडलेल्या अपघातानंतर महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. सांगवी परिसरात अहिल्यानगरकडून बीडकडे निघालेल्या आयशर टेम्पो व डोईठाणहून धामणगावकडे जाणाऱ्या अवैध वाळूने भरलेल्या टिप्परच्या टायर फुटल्याने जोरदार धडक झाली. यामुळे आयशर टेम्पोला मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर आयशर टेम्पो चालकाने आष्टी पोलिस ठाण्यात निष्काळजीपणाने वाहन चालवून जखमी करणे व वाहनाचे नुकसान करण्याची फिर्याद दिली. घटनास्थळी महसूलच्या तलाठ्यांनी हजेरी लावून पंचनामा केला, ज्यात वाहनातील दोन ब्रास वाळू नोंदवण्यात आली. मात्र, ही वाळू जप्त करणे महसूल विभागाचे काम असताना ती जप्त न करता सोडली गेली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पंचनाम्यात नोंदवलेल्या वाळूतील दोन ब्रास चोरीला गेले, पण त्याचा शोध कोण घेणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, अवैध वाळू संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी तहसिलदार यांना पत्रव्यवहार केला आहे. तपासात आलेल्या गैरव्यवहारामुळे महसूल विभागाच्या जबाबदार अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांकडून कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.