

Sindphana river flood
शंकर भालेकर
शिरूर : आष्टीसह, पाटोदा, शिरूर, पाथर्डी तालुक्यात पुन्हा एकदा वरुणराजाचा प्रकोप झाल्याने सिंदफणा नदीने गेल्या अनेक दशकानंतर रुद्रावतार धारण केल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. रविवारी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंदफणानदीसह उपनद्याला मोठा पूर आलाने नदी लगतच्या शेतीला मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टर कापूस, उडीद, सोयाबीन, बाजरी, ऊस आदी पिके वाहून जाऊन जमीनदोस्त झाली आहेत. अनेक गावांचा संपर्क ही तुटला असल्याचे चित्र अनेक वर्षा नंतर शिरूर तालुक्यात पहिल्यादाच पाहायला मिळाले आहेत.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवार दि. 13 सप्टेंबर पासून जिल्ह्यामध्ये वरून राजा सक्रिय झाला असून, जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या आठ-दहा दिवसापासून शिरूर तालुक्यातही सातत्यपूर्ण पाऊस पडत असल्याने शेतातील उभे पिके शेतीत पाणी साचल्यामुळे सडू लागली आहेत. कापसाची झालेली मोठमोठाली बोंडे पावसामुळे सडू लागली आहेत. गेल्या सोमवारी सिंदफणा नदीला पूर आला होता यातच अनेक शेतकऱ्यांची पिके ही पाण्याखाली गेली होती. तर अतिवृष्टीमुळे उभे पिके ही सडू लागल्याने प्रशासनाकडून पंचनामे सुरूही करण्यात आले होते. त्यातच पुन्हा रविवार दि. 21 सप्टेंबर रोजी आष्टी पाटोदा शिरूर आणि पाथर्डी रात्रभर अतिवृष्टी झाल्याने सिंदफणा नदीने आपली हद्द सोडली आहे.
तर तालुक्यातील किना,उथळा, कापरी आदी उपनद्यासह महापूर आल्याचे सोमवारी पाहायला मिळाले आहे. सुदैवाने कुठल्याही जीवितहानीची नोंद झाली नसली तर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे व नदीच्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतामध्ये राब राब राबून बहरात आणलेली पिके वरून राजाच्या प्रकोपामुळे जमीन दोस्त झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आले आहे. शेतामध्ये होणारे नुकसान पाहून शेतकऱ्यांना गहिवरून येत असून येत असेल अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. सिंदफणा नदीच्या तीरावर्ती सुमारे एक किलोमीटर रुंदीचे पाणी वाहत असून यामध्ये हजारो हेक्टर शेती जमीन दोस्त झाली आहे. गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच असे हे विदारक चित्र तालुक्यातील शेतकऱ्यांना पाहायला मिळाल्याने किंबहुना नुकसानीला सामोरे जायची वेळ आल्याने शेतकरी राजा आता पुरताच हापकला आहे. तर या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासन अगदी सकाळपासूनच धावून कामाला लागले असून आपत्कालीन व्यवस्थेबद्दल सतर्क झाले आहे.
गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच सिंदफणा नदीने रुद्रावतार धारण केल्यामुळे सिंदफणा नदीच्या दक्षिण- उत्तर तिरांना जोडणारे तालुक्यातील सर्व पुलावर सुमारे 15 ते 20 फुट उंचीचे पाणी वाहत असल्यामुळे दक्षिण -उत्तर तीरावरील गावांचा सोमवारी परस्पर संपर्क तुटल्यामुळे अनेक कामाचा खोळंबा झाला आहे.
सकाळपासूनच पूर जन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विद्युत वितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केला आहे. यामुळे सोमवारी विद्युत पुरवठा अभावे मोबाईल सेवेचे टॉवर्स गत प्राण झाले आहे यामुळे दैनंदिन जीवनाला मोठा फटका बसला आहे तर नेट करी दिवसभर हिरमुसल्या चेहऱ्याने मोबाईल कडे पाहून नेटवर्क मिळत नसल्यामुळे मनस्ताप करीत आहेत.