

बीड: आष्टी तालुक्यातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हॉटेलच्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी, 'हा अपघात नसून खून आहे' असा गंभीर आरोप करत कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. न्यायाच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी थेट बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातच ठिय्या मांडल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
आष्टी तालुक्यातील खडकत येथील एका हॉटेलमध्ये गेवराई तालुक्यातील धेनटाकळी येथील सिताराम रखमाजी ढवळे (वय ४०) हे मागील महिन्याभरापासून कामगार म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी सहा ते सातच्या सुमारास हॉटेलच्या वरच्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र, मृत्यूची परिस्थिती आणि कारण संशयास्पद वाटल्याने कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
कुटुंबीयांच्या मते, सिताराम यांचा मृत्यू हा साधा अपघात नसून, त्यांची हत्या करण्यात आली आहे. जोपर्यंत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. या भूमिकेमुळे शनिवारी सकाळपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, न्यायासाठी कुटुंबीय व नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाचा दरवाजा ठोठावला आहे.
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्यासह पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, हनुमान घाडगे, भरत गुजर, बिभीषण गुजर आणि चालक भाग्यवंत यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. सध्या आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाचे आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे.
कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने तो आष्टी येथील शवगृहात ठेवण्यात आला आहे. एकीकडे पोलीस आकस्मिक मृत्यू म्हणून तपास करत आहेत, तर दुसरीकडे कुटुंबीय खुनाच्या आरोपावर ठाम आहेत. आता शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या पुढील तपासात काय निष्पन्न होते, यावरच या प्रकरणाचे भवितव्य अवलंबून आहे. या घटनेमुळे आष्टी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.