

अंबाजोगाई : मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई शहर व परिसरात अल्पवयीन मुलांकडून घडत असलेल्या गंभीर घटनांनी समाजमन हादरले आहे. अवघ्या आठवडाभरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्याने पालकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील जवळगाव येथे 31 मार्च रोजी सायंकाळी अडीच वर्षांच्या चिमुरडीवर 13 वर्षीय मुलाकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित अल्पवयीन मुलावर भारतीय न्याय संहितेतील तरतुदींसह झजउडज कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेत पीडित चिमुरडी गंभीर जखमी झाली असून, उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आधीच डोंगर पिंपळा येथे एका 15 वर्षीय मुलाकडून अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यामुळे अंबाजोगाई तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सलग घडणाऱ्या घटनांमुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
अल्पवयीन मुलांमध्ये अशी विकृती का वाढत आहे? तज्ज्ञांच्या मते, मोबाईलचा अतिरेकी वापर, सोशल मीडियावरील अनियंत्रित सामग्री, तसेच पालकांचे कमी होत चाललेले लक्ष ही काही प्रमुख कारणे असू शकतात.
आजची मुले डिजिटल जगात अधिक वेळ घालवत आहेत. त्यांच्या हातात मोबाईल आहे, पण त्यावर काय पाहिले जाते, कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो, याकडे अनेकदा दुर्लक्ष होत आहे. यामुळे लहान वयातच चुकीच्या गोष्टींचा प्रभाव पडून वर्तनात विकृती निर्माण होण्याचा धोका वाढत आहे.या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्यांकडे अधिक सजगतेने लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.
मुलांशी संवाद वाढवणे, त्यांच्या मित्रपरिवाराची व सवयींची माहिती ठेवणे, मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवणे आणि वेळोवेळी समुपदेशन करणे ही काळाची गरज आहे. अंबाजोगाईसारख्या सांस्कृतिक परंपरा असलेल्या शहराची ओळख कायम राखायची असेल, तर समाजानेही या घटनांकडे गांभीर्याने पाहून पालकत्वाची जबाबदारी अधिक सजगपणे पार पाडली पाहिजे, अशी भावना व्यक्त होत आहे.