

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात वाढत्या गुंडगिरीचे धक्कादायक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. रस्त्यावर गाडीला बाजू देण्याच्या क्षुल्लक कारणावरून शहरातील नामांकित हॉटेल व्यावसायिक अविनाश परशुरामजी मेहता यांच्यावर लोखंडी रॉड व काठीने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. 8) सायंकाळी मोंढा भागातील मुख्य रस्त्यावर घडली.
विशेष म्हणजे, मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी मेहता यांच्या ‘मेवाड बिस्ट्रो’ या हॉटेलमध्ये जाऊन तोडफोडही केली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी राहुल भारत इदगले याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सुमारे सव्वासातच्या सुमारास अविनाश मेहता हे मोटारसायकलवरून घरातून हॉटेलकडे जात होते. ते मोंढा येथील मुख्य रस्त्यावर पोहोचले असता, पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधील व्यक्तींनी त्यांना वारंवार हॉर्न दिला. मेहता यांनी मोटारसायकल बाजूला घेतल्यानंतर कारमधून उतरलेल्या राहुल इदगले व त्याच्या साथीदाराने त्यांच्याशी अलील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
रस्ता असताना गाडी आडवी का लावली? असा सवाल मेहता यांनी केल्यानंतर आरोपींनी संतापून लोखंडी रॉड आणि काठीने त्यांच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर आणि पायावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात मेहता गंभीर जखमी झाले. दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या प्रतिक गुत्तेदार या तरुणालाही आरोपींनी धक्काबुक्की केली.
घटनास्थळी पोलिस येत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या मेहता यांना अनिकेत देशपांडे व अफ्रोज पठाण यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.दरम्यान, मारहाणीनंतर आरोपी थेट मेहता यांच्या ‘मेवाड बिस्ट्रो’ हॉटेलमध्ये पोहोचले. तेथे राहुल इदगले, पवार आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींनी लोखंडी रॉडच्या साहाय्याने खुर्च्या व काउंटरची तोडफोड करून सुमारे 20 हजार रुपयांचे नुकसान केले.
तसेच, पोलिसांत तक्रार केली तर जिवे मारून टाकू, अशी धमकी देत मेहता यांचा मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले.या प्रकरणी मेहता यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लक्ष्मणराव घुगे करत आहेत.
अत्यंत वर्दळीच्या भागात टोळक्याने खुलेआम मारहाण व तोडफोड केल्यामुळे अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. व्यापारी वर्गात या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.