

According to the Hyderabad Gazette, Vasant Ugle received his first Kunbi certificate.
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर शासनाने लागू केलेल्या हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयानुसार बुधवारी (ता. १७) विभागातील पहिले कुणबी प्रमाणपत्र चिंचगव्हाण (ता. माजलगाव) येथील वसंत दगडोबा उगले यांना देण्यात आले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण सुरू केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. शासनाने या गॅझेट अंतर्गत प्रमाणपत्र वितरणाची कार्यप्रणाली निश्चित करून १७ सप्टेंबरपासून प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते.
कडक चौकशीनंतर प्रमाणपत्र वाटप वसंत उगले यांनी सादर केलेल्या अर्जावर स्थानिक त्रिसदस्यीय समिती (ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहायक) यांनी कागदपत्रांची बारकाईने तपासणी करून तहसील कार्यालयाला अहवाल सादर केला. तहसील पातळीवरही पडताळणी झाल्यानंतर प्रमाणपत्रासाठी हिरवा कंदील मिळाला. मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरलेल्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो लाभार्थ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आर-क्षणाच्या लढ्याला नवी दिशा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी हैदराबाद गॅझेटनुसार वसंत उगले यांना पहिले कुणबी प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी इंगोले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.