

गौतम बचुटे/केज (बीड)
केज जवळील टोलनाक्यावर चालत्या ट्रकवर चढून बी बियाण्यांची चोरी करणाऱ्या विशाल तायड्या शिंदे याला ट्रकच्या पाठीमागे असलेल्या दंगल नियंत्रण पथकाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याला केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, औरंगाबाद येथून महामंडळाच्या हरभऱ्याच्या वाहनाचे बियाणे हे केज येथील कृषी व्यापाऱ्याकडे घेऊन ट्रक निघाला होता. हा ट्रक दि. २२ सप्टेंबर रोजी पहाटे ५:४५ वाजण्याच्या सुमारास मांजरसुंबा-केज रोडवरील उमरी फाट्याजवळच्या टोल नाक्यावर आलेला असताना अज्ञात चोरटा या ट्रकवर चढून ताडपत्री फाडून आतील हरभऱ्याचे बियाणे चोरी करीत होता.
दरम्यान याचवेळी त्या ट्रकच्या पाठीमागे केज येथे बंदोबस्तासाठी असलेली दंगल नियंत्रण पथकाची गाडी होती. त्यातील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी त्या चोरट्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याचे नाव विशाल तायड्या शिंदे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ट्रक चालकाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.