

A 51-foot-tall effigy of Ravana will be burnt in Dharur
धारूर, पुढारी वृत्तसेवा विजयादशमीच्या निमित्ताने किल्ले धारूर येथे यंदाही रावणदहनाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ऐतिहासिक दसरा मैदानावर होणाऱ्या या सोहळ्याचे यंदा २८ वे वर्ष असून, यावेळी ५१ फूट उंच रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे. या पारंपरिक उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, भव्य आतषबाजी, लेझर शो आणि रामलीलेच्या सादरीकरणामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
धारूर शहरातील ऐतिहासिक दसरा मैदानावर गेल्या २८ वर्षांपासून रावणदहनाची परंपरा जपली जात आहे. यंदाचा सोहळा अधिक भव्य आणि आकर्षक करण्यासाठी उत्सव समितीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील सजावट क्षेत्रातील कलाकार विश्वनाथ कांबळे यांनी पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर करून ५१ फूट उंच रावणाची प्रतिमा तयार केली आहे. आकर्षक सजावट, नेत्रदीपक आतषबाजी आणि लेझर शो यामुळे या सोहळ्याची भव्यता वाढणार आहे.
रावणदहनापूर्वी रामलीला आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक कलाकारांच्या सहभागातून रामायणातील युद्धप्रसंगांवर आधारित रामलीलेचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमामुळे श्रीरामभक्तांना धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेता येणार आहे.
परिसरातील हजारो नागरिक दरवर्षी या सोहळ्याला उपस्थित राहतात. यंदाही मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दसरा मैदानावर जय्यत तयारी विजयादशमीच्या दिवशी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन उत्सवस्थळी विविध व्यवस्था करण्यात येत आहेत. दसरा मैदानावर मंडप उभारणी, ध्वनियंत्रणा, सजावट आणि रंगकामाची कामे वेगाने सुरू आहेत.
सायंकाळी सात वाजता रावणदहन
विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी सात वाजता रावणदहनाचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. या भव्य सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी उत्सव समितीच्या वतीने सर्व श्रीरामभक्त, भाविक आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.