

शिरूर : श्री संत भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहाच्या ९१ व्या वर्षीचे यजमानपदाचे शिवधनुष्य हे पिंपळनेर (ता.शिरूर, जि.बीड) ग्रामस्थांनी उचलले आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी (दि.१०) सप्ताहाचा फुले टाकून प्रारंभ करण्यात आला.
श्री संत भगवानबाबा यांनी फिरता नारळी सप्ताहाचा नाविन्यपुर्ण उपक्रम ९१ वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या पखालडोह या ठिकाणी सुरू केला. त्यांच्यानंतर या सप्ताहाची परंपरा श्री क्षेत्र भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी वै.ह.भ.प.गुरुवर्य श्री संत भिमसिह महाराज यांनी सुरू ठेवले होते. भीमसिंह महाराजांच्या वैकुंठगमनानंतर श्री क्षेत्र भगवानगडाचे विद्यमान मठाधिपती ह.भ.प.महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हा नारळी सप्ताहाला महाराष्ट्रातून लाखो भाविकांची उपस्थिती असते.
१० ते १७ एप्रिल हा या महोत्सवाचा कालावधी असून सप्ताहामध्ये दररोज दुपारी ३:३० ते ६ या वेळेमध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांची श्रीमद् भागवत कथा संपन्न होणार आहे. सप्ताहामध्ये अनुक्रमे ह.भ.प.महंत कृष्णा महाराज शास्त्री (उत्तराधिकारी भगवानगड), ह.भ.प. प्रभाकर महाराज बोधले (पंढरपूर), ह.भ.प.सोपान महाराज शास्त्री (भागवताचार्य), ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर (समाज प्रबोधनकार), ह.भ.प.अमृत महाराज जोशी (महामंडलेश्वर), ह.भ.प.श्री.ज्ञानेश्वर महाराज जळकीकर (जळगांवकर) यांचे कीर्तन होणार आहे. सप्ताहाच्या सातव्या दिवशी रात्री ठीक ८:३० ते ११ या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे जागराचे जाहीर हरीकीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहामध्ये परंपरेप्रमाणे दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ हे कार्यक्रम होणार आहेत.