मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठकीतील जल्लोष पडला महागात, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठकीतील जल्लोष पडला महागात, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : सकल मराठा समाजाच्या वतीने परळी वैजनाथ येथे मनोज जरांगे-पाटील यांची महासंवाद बैठक काल दि.२० रोजी आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने या बैठकीला प्रशासनाने नाकारण्यात आलेली परवानगी न्यायालयाने दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी जमा होत फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला होता.या प्रकरणात २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी वैजनाथ येथे दि. 20.03.2024 रोजी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले व सन 2024 चे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहितेचे अनुषंगाने जिल्हाधिकारी बीड यांचे आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन २६ जणांविरुद्ध पोलीस ठाणे परळी शहर येथे गु.र.नं. 46/2024 कलम 188 भा.द.वि. सह कलम 135 म. पो. अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो.ना. 1918 भताने हे करीत आहेत.

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. परळी येथे होणाऱ्या कार्यक्रमास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती. तसेच याप्रकरणी 28 जणांना नोटीसही दिल्या होत्या . या बैठकीच्या परवानगीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात दाद मागण्यात आली होती. यावर न्यायालयाने या महासंवाद बैठकीला परवानगी दिली. सकल मराठा समाजाने अटी व शर्तीच्या अधीन राहून ही सभा घ्यावी अशी परवानगी दिली. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर परळीत सकल मराठा समाजाच्या वतीने चौका चौकात फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता मात्र हा जल्लोष सातारा महागात पडला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button