बीड : बोअरवेल व्हॅनचा विजेच्या तारांना स्‍पर्श; २ मजुरांचा मृत्‍यू; २ जण जखमी | पुढारी

बीड : बोअरवेल व्हॅनचा विजेच्या तारांना स्‍पर्श; २ मजुरांचा मृत्‍यू; २ जण जखमी

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा परळी शहराजवळ दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास एक थरारक अपघात घडला आहे. बोअरवेल पाडण्यासाठी आलेल्या गाडीचा वीज वाहक तारांशी संपर्क आला. यामुळे या गाडीममध्ये वीजवाहक तारांमधून करंट उतरून या गाडीत असलेले दोन मजूर मृत्युमुखी पडले. तर अन्य दोन मजूर जखमी झाले आहेत. मृत्यू पावलेल्या मजुरांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. दोन जखमींवर येथेच उपचार सुरू आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील वाघबेट येथे पाण्याचा बोर पाडण्यासाठी ओरिसा राज्यातील मजुरांसह बोरवेल मशीन घेऊन सहा जणांचे एक पथक आले होते. या गावातील बोरवेल पाडण्याचे काम संपल्यानंतर बोरवेलची ही गाडी परळी शहराकडे येत होती. रस्त्यात वीजवाहक तारांना या गाडीचा संपर्क झाला. वीज वाहकतारांचा विद्युत प्रवाह संपूर्ण लोखंडी पाईप असलेल्या या गाडीत उतरला. या गाडीमध्ये एकूण सहा मजूर बसलेले होते. त्यापैकी करंट लागून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोनजण जळून जखमी झाले आहेत.

बोरवेल वरील हे सर्व मजूर ओडिसा राज्यातील असून, गोविंदा धवन सिंग व संदीप डाक्टर असे मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अन्य दोन मजूर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या वाहनाच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Back to top button