बीड : धारूर शहरातील वराह स्वाईन फीवर साथीच्या रोगाने बाधित | पुढारी

बीड : धारूर शहरातील वराह स्वाईन फीवर साथीच्या रोगाने बाधित

धारूर; अतुल शिनगारे : धारूर शहरातील नगरपरीषद हद्दीत मोकाट वराहाचा वावर वाढला आहे. अनेक वराह शहरामध्ये मोकाटपणे वावरतात. मागील काही दिवसांमध्ये अचानकपणे काही वराहांचा मृत्यू झाला होता.

धारूर शहरातील अनेक भागातील वराह (डुकरांचा) अचानकपणे मृत्यू झाल्याने येथील नागरिकांनी नगर परिषदेकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत नगर परिषदेने पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क साधून वराहचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने होत आहे याचा तपास करण्यास सांगितले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू झालेल्या वराहाचे सॅम्पल घेऊन ते मुंबई तसेच भोपाळ येथे पाठवले आहेत. हे सॅम्पल स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आल्याने याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयसह नगरपरिषद, पोलीस स्टेशन आधी संबंधित कार्यालयात देण्यात आला. याबाबत पशुसंवर्धन आयुक्त जिल्हाधिकारी यांनाही माहिती देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरातील बारा बाई गल्ली व एक किलोमीटर पर्यंतचा भाग स्वाइन फिवर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

वरिष्ठांच्या आदेशाने नगरपरिषदेच्या सहकार्याने धारूर शहरातील वराह समूह नष्ट करण्यात येणार आहे. यामुळे स्वाइन फिवर आटोक्यात येईल व यातून नागरिकांना कुठलाही धोका होणार नाही असे सांगण्यात आले. पोलीस प्रशासन नगरपरिषद प्रशासन या सर्वांची मदत घेऊन शहरातील सर्व वराह डुकरे नष्ट करण्यात येणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले. यामुळे मात्र धारूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरी तात्काळ यावर उपाययोजना करून रोगराई पसरणार नाही याची काळजी घेण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

Back to top button