औरंगाबाद : देवगिरी नदीच्या पुरात अल्पवयीन मुलगी वाहुन गेली

औरंगाबाद : देवगिरी नदीच्या पुरात अल्पवयीन मुलगी वाहुन गेली
Published on
Updated on

वाळूज महानगर ; पुढारी वृत्तसेवा : तीसगावच्या देवगिरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या एक महिलेसह दोन अल्पवयीन मुली वाहुन गेल्याची घटना रविवारी (दि.११) दुपारी २:३० वाजताच्या सुमारास तिसगाव हद्दीत घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलीस कर्मचाऱ्यांना दोघींना वाचविण्यात यश आले. राधा नागजी सावडा (वय १४) ही अल्पवयीन मुलगी पुराच्या पाण्यात वाहुन गेली असून रात्री उशिरापर्यंत दोन पथकांच्या साहाय्याने अग्निशमन जवान तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सिडको वाळूज महानगरातील म्हाडा कॉलनी परिसरात गेल्या १५ वर्षांपासून गुजरातमधील १० ते १२ पशुपालक कुटुंबीय राहतात. रविवारी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास या पशुपालक कुटुंबियातील हिरुबेन रघुन जाधव (५०), नितु कालु जाधव उर्फ जोगराणा व राधा नागजीभाई सावडा (१४) या नातेवाईक असलेल्या तिघीजणी ए.एस.क्लबच्या पाठीमागे असलेल्या कल्याणी सिटीजवळ देवगिरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दुपारच्यावेळी वाळूज महानगर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने देवगिरी नदीला पूर आला. या कपडे धुण्यासाठी गेलेल्या हिरुबेन, नितु व राधा या तिघी पुराच्या पाण्यात अडकल्या. दरम्यान त्यांनी मदतीसाठी आरडा-ओरडा केला. मात्र क्षणार्धात पुराचा जोर वाढल्याने या तिघी वाहुन जाऊ लागल्या.

लाकडाच्या ओंडक्यामुळे दोघी बचावल्या

देवगिरी नदीला आलेल्या पुरात या तिघी वाहुन जात असतांना त्यांनी वाहत आलेल्या एका लाकडी ओंडक्याचा आधार घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मदतीसाठी आरडाओरडा करू लागल्या, मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी प्रयत्न केले मात्र पुराची पाणी पातळी वाढल्याने तेही हताशपणे नदीच्या काठावर थांबले. दरम्यान वेळेवर पोहचलेल्या पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी वाहून जात असलेल्या एकीला ५० ते ६० मीटरच्या अंतरावर तर दुसरीला एका पुलाजवळ सुखरूप बाहेर काढले. मात्र १४ वर्षाची राधा नागजी सावडा ही पुराच्या पाण्यात वाहुन गेली. केवळ लाकडी ओंडक्यामुळे या दोघींचा जीव वाचला आहे.

पोलिस कर्मचारी गाडे थोडक्यात बचावले

दरम्यान पुराच्या पाण्यात एक महिला व दोन मुली आडकल्याची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे सहा. निरीक्षक मदनसिंग घुनावत, पोकॉ.किशोर संजय गाडे, अवचरमल, थोरात, पाटील यांच्यासह वाळूज एमआयडीसी व महानगरपालिकेचे अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून किशोर गाडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी पुरात आडकलेल्या हिरुबेन व नितु जाधव या दोघींना वाचविण्यासाठी नदी पात्रात उडी घेतली. मात्र गाडे यांच्या हातातुन दोर सुटल्याने ते पुराच्या पाण्यात वाहुन जाऊ लागले. यावेळी मदतीसाठी आलेले नागरिक, पोलीस व अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोकॉ. गाडे यांना वेळीच मदत करून पाण्यातून बाहेर काढले. नाकातोंडात पाणी गेल्याने गाडे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेळीच मदत मिळाल्याने गाडे यांचा जीव वाचला आहे.बेपत्ता अल्पवयीन राधाचा शोध सुरु आहे.

पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्या अल्पवयीन राधा नागजी सावडा हिचा शोध घेण्यासाठी अग्नीशमनच्या जवानांनी बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. सांयकाळी उशिरापर्यंत राधा हिचा शोध लागला नसून तिच्या शोधासाठी अग्नीशमन दलाचे जवान देवगिरी व खामनदी पात्रात सांयकाळी उशिरापर्यंत शोध घेत होते. पुरात वाहुन गेलेली राधा सावडा ही म्हाडा कॉलनी परिसरातील आहे.

तहसीलदार चव्हाण यांची घटनास्थळाला भेट

या घटनेची माहिती मिळताच अप्पर तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी अनिल कुलकर्णी, तलाठी दिलीप जाधव, तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, माजी सरपंच संजय जाधव, राजेश कसुरे, भरत सलामपुरे, मोहनसिंग सलामपुरे, संतोष शहाणे, राहुल कसुरे आदींनी मदत केली. यावेळी अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी सावडा व जाधव कुटुंबियांच्या घरी भेट देऊन त्यांना आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन देऊन त्यांचे सांत्वन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news