अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यात बाळापूर येथे अवकाळी पाऊसामुळे शेतातील विहीर पाण्याने भरल्याने खचल्याची घटना घडली. या घटनेत नारायण निंभोरे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बाळापूर येथील निंभोरे यांच्याकडे उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन नसून ते शेतीवरच अवलंबून आहेत, त्यामुळे आता विहीर नसल्याने समोरील पीक कसे घेणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना शासनस्तरावरून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. खचलेल्या विहिरीचा तलाठी रवींद्र कुलकर्णी यांनी पाहणी करून पंचनामासुद्धा केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे नारायण निंभोरे यांनी सांगितले. तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी शेतकऱ्यांतून हाेत आहे. बाळापूर येथे अवकाळी पावसाने संपूर्ण विहीर खचली आहे.