

वडवणी, पुढारी वृत्तसेवा
वडवणी शहरातील स्व.वसंतराव नाईक चौकातील बालाजी फर्निचर आणि इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स सेंटरच्या दोन मजली शोरुमला आज दि.२७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होवून भीषण आग लागली. या आगीत दोन मजली शोरुम जळून खाक झाले. या आगीत अंदाजे ५० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती मालक विजय मायकर यांनी दिली. दरम्यान अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी व वडवणीकरांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
वडवणी नगरपंचायतच्या अग्निशमन दलाची गाडी नादुरुस्त
वडवणी नगरपंचायतीने ४० लाख रुपये निधी खर्च करुन, नगरपंचायतीला अग्निशमन दलाची गाडी खरेदी केलेली आहे. मात्र ही गाडीच नादुरुस्त असल्याने आग विझवण्यासाठी बाहेरील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करावे लागले. नगरपंचायतची ही गाडी उपलब्ध असती तर आग वेळीच आटोक्यात आली असती.
याबाबत वडवणी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, अग्निशमन दलाची गाडी नादुरुस्त असल्याने ती दुरुस्तीसाठी पाठवलेली आहे. त्यामुळे उपलब्ध झाली नाही. लवकरच ती उपलब्ध होईल असे ते म्हणाले.
वडवणीची मोठी कापड बाजारपेठ सर्व मराठवाड्यात नामांकित असून प्रशासनाने आजच्या आगीची गंभीर दखल दखल घेवून लवकर उपलब्ध करावी अशी मागणी होत आहे.
हेही वाचा