मराठा-कुणबी एकच आहे, असा अध्यादेश शासनाने काढावा: जरांगे-पाटील

मराठा-कुणबी एकच आहे, असा अध्यादेश शासनाने काढावा: जरांगे-पाटील

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मराठा – कुणबी एकच आहे असा अध्यादेश शासनाने काढावा व सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी तात्काळ करावी, या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आज (दि.८) उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असतानाही ते उपोषणावर ठाम आहेत. आज सकाळी दहा वाजता ते उपोषणासाठी अंतरवाली सराटीत बसले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, समाजाला न्याय मिळवण्यासाठी उपोषण सुरू झाले आहे. हे आमरण उपोषण आहे. सरकारने जाणूनबुजून परवानगी नाकारली आहे. पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की, ज्या लोकांनी निवेदन दिले आहे, ती लोक आमच्या लोकांना त्रास देत आहेत. शिवीगाळ करत आहेत.  प्रशासनाने कायदा सुव्यवस्था बिघडू देऊ नये. यावेळी मराठा समाजाने शांत राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सरकार आणि प्रशासनाच्या वतीने जातीय तेढ शब्द वापरला जातोय. या जातीय तेढ शब्दात द्वेष दिसतोय.  निवडणूका झाल्या आहेत. मागे शिंदे- फडणवीस यांनी जो सगे सोयरे कायद्याचा अध्यादेश काढला आहे. त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी हे उपोषण आहे.  प्रशासनाने गोरगरिबांना वेठीस धरू नये. परवानगी  न देणे हे षड्यंत्र आहे.आम्हाला राजकारण नको. आमच्या मागण्या पूर्ण करा. लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असेही ते म्हणाले.

अंतरवाली परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, काही लोकांनी निवेदन दिले, त्यामुळे दंगल होईल, अशी पोलिसांना भीती असेल, म्हणून बंदोबस्त असेल. एक तर दंगल रोखायला पोलिस आले असतील नाही तर आम्हाला धोपटायला आले असतील.

यावेळी गावागावात आंदोलन नको, कुठेही काहीही नसेल आंदोलन फक्त अंतरवालीत होईल. माझ्या एका हाकेवर लाखो लोक येतील. सरकारला पाहायचं असेल, तर पाहावे. मला राजकारण करायचे नाही. पण आरक्षण दिले नाहीतर मी का राजकारणात आलो म्हणून मग सरकारने बोंबलायचे नाही. माझ्या तब्येतीमुळे उपोषण करू नका, असे समाजाला वाटते. पण एक गेला तरी चालेल. न्याय मिळायला हवा. आमदारांनी नेत्याजवळ जावे, आणि सांगावे मराठ्यांना न्याय द्या, नंतर विचारायला तोंड राहणार नाही,  असेही ते म्हणाले.

मी उपोषणाला बसलो, तर काही लोक उपोषणाला परवानगी देऊ नये, म्हणून निवेदन देत आहेत. उद्या नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ  घेणार आहेत. मग मी पण निवेदन पाठवतो ,तुम्ही शपथ घेवू नका,  यामुळे  देशात गोंधळ होईल. तर ते शपथ घेणार नाही का? असे नसते विरोधासाठी विरोध करणे, ही चांगली गोष्ट नाही.

चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत…

अंतरवालीतील या व्यासपीठावर सरकार आणि प्रशासनाच्या वतीने कोणीही येऊ शकते. कुणीही चर्चा करू शकते. चर्चेतूनच मार्ग निघत असतात. त्यामुळे कोणी चर्चेला येऊ नये, आम्ही येऊ देणार नाही, अशी आमची भूमिका नाही. चर्चेसाठी दारे खुली असल्याचेही त्यांनी  यावेळी सरकारला सांगितले.

शेतीची कामे पूर्ण करा,पेरणी करा मगच अंतरवालीत या…

सध्या अनेक भागात पाऊस पडलेला आहे. काही ठिकाणी शेतीची मशागतीचे कामे सुरू आहेत. त्यामुळे समाजाने पहिले शेतीचे कामे करावे. पेरण्या कराव्यात. मगच अंतरवालीत यावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सरकारने प्रश्न सोडवावा

सरकारने मुलामुलींना मोफत शिक्षण सुरू करावे, एसईबीसीमधून फॉर्म भरले आहेत. त्यांना सहकार्य करावे, कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना त्याचा फायदा द्या, अशा मागण्या  जरांगे यांनी  यावेळी सरकारकडे केल्या आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news