

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : रिठ्ठी येथे शेतात काम करत असताना कोळसवाडी (ता. कन्नड) येथील एक ३५ वर्षीय मजूराचा वीज पडून मृत्य झाला. तर दोन जण जखमी झाले. ही घटना आज (दि.२३) दुपारी चारच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोळसवाडी येथील तीन मजूर मौजे रीठ्ठी येथे मजुरीसाठी आले होते. दरम्यान कन्नड शहर परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात वीज पडून रावसाहेब खंडू निळ (वय ३५) हे जागीच मृत्युमुखी पडले. त्यांच्यासोबत काम करणारे फकीरराव मुगले, आकाश दामू हे जखमी झाले. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या शेतात कांदे काढण्याचे काम सुरू असून पाऊस सुरू झाल्याने हे तिघे मजूर आंब्याच्या झाडाखाली पाऊस लागू नये, म्हणून उभे राहिले. त्याच झाडावर वीज कोसळली. यात एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले. त्यांच्या पन्नास फूट अंतरावर अजून १७ ते १८ मजूर होते. मात्र, ते सुदैवाने बचावले.