

कंधार, पुढारी वृत्तसेवा : इमामवाडी येथील रामदास सोपान करेवाड (वय ३५ ) आणि त्यांची पत्नी वर्षा रामदास करेवाड (वय ३०) यांनी सोमवारी (दि.१५) आपले जीवन संपविले होते. याप्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात संतोष प्रभाकर करेवाड यांच्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, रात्री १ च्या सुमारास मृत रामदास यांची आई सुमनबाई सोपान करेवाड (वय ६०) यांनी फिर्यादी दिली. त्यावरून जि.प. शिक्षक सुभाष रामराव कदम, त्यांची पत्नी लता सुभाष कदम, मुलगी शितल सुभाष कदम आणि वर्षा रामदास कदम यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कंधार तालुक्यातील इमामवाडी येथे पती पत्नीने वेगवेगळ्या पध्दतीने सोमवारी आपले जीवन संपविले होते. पती रामदास करेवाड हा कंधार येथील खाजगी दवाखान्यात काम करत होता. तर पत्नी वर्षा करेवाड ही कंधार येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होती.
इमामवाडी येथील जि.प.शाळेच्या शालेय समितीवर वर्षा ही उपाध्यक्ष होती. दरम्यान याच शाळेतील शिक्षक सुभाष कदम व वर्षा यांच्यात निकटचे संबंध आले. त्यातून दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले होते. ही माहिती कदम यांच्या घरी कळाल्यावर कदम यांच्या मुलीने रामदास करेवाड यांना फोन करून तुझ्या बायकोला नीट सांभाळ, अन्यथा तिचा खून करू अशी धमकी दिली होती.
त्यानंतर रामदास मानसिक तणावात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रामदास यांनी एक चिठ्ठी लिहिली असून या चिठ्ठीत माझ्या मृत्यूस शिक्षक सुभाष कदम, मुलगी शीतल सुभाष कदम हे जबाबदार असतील, असे लिहिले आहे. मृत पती पत्नीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव करत आहेत.