हिंगोली: आखाडा बाळापूर येथील कृषी पर्यवेक्षकाच्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस | पुढारी

हिंगोली: आखाडा बाळापूर येथील कृषी पर्यवेक्षकाच्या मारेकऱ्याची माहिती देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा :  आखाडा बाळापूर येथील कृषी विभागाच्या बिज गुणन केंद्रात कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांचा खून करून फरार झालेल्या पांडुरंग भालेराव याची माहिती देणाऱ्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा आखाडा बाळापूर पोलिसांनी केली आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आखाडा बाळापूर येथील कृषी विभागाच्या बिज गुणन केंद्रात कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ यांचा दि १४ मार्चरोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खून झाला होता. गवत जाळल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून तेथे काम करणारा मजूर पांडूरंग भालेराव यानेच त्यांचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, खून करून फरार झालेला पांडुरंग अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, यांच्या पथकाने त्याचा शोध सुरु केला आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मलपिल्लू यांचे पथकही रवाना केले आहे. दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अहमदनगर, पुणे, नाशिक या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला. मात्र, अद्यापही पांडुरंगचा ठावठिकाणा लागलेला नाही. विशेष म्हणजे पांडुरंग यास कपडे व पैसे आणून देत पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून त्याच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आखाडा बाळापूर पोलिसांनी फरार पांडुरंग याच्यावर ५० हजारांचे बक्षीस  ठेवले आहे.

हेही वाचा 

Back to top button