भिशी लावताना सावधान!: महिलेसह सहा जणांना 13 लाखांचा गंडा; दोघांविरुद्ध गुन्हा | पुढारी

भिशी लावताना सावधान!: महिलेसह सहा जणांना 13 लाखांचा गंडा; दोघांविरुद्ध गुन्हा

नांदेड, पुढारी वृत्तसेवा ः भिशीच्या बहाण्याने एका महिलेसह सहा जणांना 13 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी इतवारा पोलिसांनी दोन आरोपीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. फायनान्स व भिशीच्या नावाखाली अनेकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची पोलखोल करणारी निर्भीड वृत्तमालिका ‘पुढारी’ त सुरु झाल्यानंतर ही पोलिसांनी केलेली दुसरी मोठी कारवाई आहे.

इतवारा ठाणे क्षेत्रातील राजनगर येथील आकाश संभाजी पवार व संकेत संभाजी पवार या दोन सख्ख्या भावांनी भिशी सुरु केली. मित्र व परिचित लोकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांना या भिशीत सहभागी करून घेतले.

सुकेशिनी प्रमोद जोंधळे व त्यांच्या पाच नातेवाईकांनी देखील या भिशीमध्ये गुंतवणूक केली. यातील काहींना भिशी लागली मात्र पैश्याचे काम असल्याने पुढच्या महिन्यात देतो असे सांगत ही रकम दोन्ही आरोपींनी स्वतःजवळ ठेवून घेतली. या पैश्याच्या मोबदल्यात आणखी जास्त पैसे मिळतील, असे आमिष देखील दाखवले. मात्र अनेकवेळा पैसे मागूनही ते दिले जात नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दोन्ही आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने सुकेशिनी जोंधळे आणि अन्य पाच जणांनी इतवारा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आकाश आणि संकेत पवार या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव करीत आहेत.

सुकेशिनी जोंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 10 लाख 53 हजार 200 रुपये रोख व चार तोळे सोने असे एकूण 12 लाख 93 हजार 200 रुपयांची फसवणूक झाली.

या भागात आरोपींनी भिशीचे व्यवहार करण्यासाठी कार्यालय स्थापन केले होते. याच ठिकाणी देण्या-घेण्याचे व्यवहार केले जात असत. मागील 15 दिवसांपासून हे कार्यालय बंद आहे. त्यामुळे फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर एकूण सहा जणांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

गुन्हा दाखल होण्यापूर्वीपासून दोन्ही आरोपी फरार आहेत. या आरोपींचा शोध सुरु असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी व्यक्त केला. या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असून आणखी बरेच गंडवलेले पुढे येण्याची आहे.

‘पुढारी’मध्ये अवैध फायनान्स आणि भिशी संदर्भातील व्यवहाराची पोलखोल करणारी मालिका सुरु झाल्यानंतर पहिला गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाला. कापड व्यापारी निलेश सुत्रावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोह्यातील पाच सावकारांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भिशी ते किटी पार्टीपर्यंतचा महिलांचा प्रवास

महिन्याकाठी जमलेले पैसे एकत्र करून प्रत्येकाला त्याची ठराविक रकम वाटण्यासाठी भिशी टाकली जाते. महिला या भिशीमध्ये अग्रेसर आहे. महिलांमध्ये भिशी हा गुंतवणुकीचा प्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक सोसायट्यांमध्ये महिला एकत्र येऊन भिशीच्या दिवशी नाचगाणी, मनोरंजनाचे खेळ खेळतात. अनेकदा यामध्ये फसवणूक होते. मात्र इभ्रतीपोटी आणि पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून तक्रार दिली जात नसल्याने अशा प्रकरणात पुढे काही होत नाही.

Back to top button