Manoj Jarange-Patil : अन्नात माती कालविण्याशिवाय भुजबळांना दुसरे काम नाही : मनोज जरांगे | पुढारी

Manoj Jarange-Patil : अन्नात माती कालविण्याशिवाय भुजबळांना दुसरे काम नाही : मनोज जरांगे

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: छगन भुजबळ यांना लोकांच्या अन्नात माती कालवण्याशिवाय दुसरे काम राहिलेले नाही. ते आता बेकार झाले आहेत. सगे सोयऱ्यांचे राजपत्र निघालेले आहे. सगे सोयरे हा अंतिम शब्द असून लाखो लोकांचा फायदा होणार आहे. त्याने कितीही विरोध केला, हरकती घेतल्या, तरी त्याच्या विरोधाने आता काहीच होणार नाही, अशी टीका मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी केली. अंतरवाली सराटीहून रायगडावर दर्शनाला निघताना ते पत्रकारांशी संवाद साधत होते. Manoj Jarange-Patil

आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी रायगडावर चाललो आहे. उद्या रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होणार असल्याचे मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले. Manoj Jarange-Patil

पुढे ते म्हणाले की, ओबीसी नेते आक्षेप घेण्याचे आवाहन करत आहेत. सोशल मीडियावर नकारात्मक लिहित बसू नका. तुमच्यामुळे मराठे पुन्हा जिंकतील. हरकती मांडा, फक्त सोशल मीडियावर सज्ज होऊ नका, असा सल्ला त्यांनी विरोधात बोलणाऱ्यांना दिला. समाजातील काही जाणकार लढ्यात जिंकले, तहात हारले अशा वावड्या उठवत आहेत. त्यांनी समाजासाठी काही का केले नाही. ते आतापर्यंत दहा गोधड्या अंगावर घेवून का झोपले होते ? सोशल मीडियावर काही मांडण्यापेक्षा हरकती मांडा, ताकद लावा, कायदा मजबूत होण्यासाठी अभिप्राय मांडा, असे सुनावत जरांगे यांनी सोशल मीडियावरील वाचाळवीरांची कानउघाडणी केली.

मराठा समाजावर ७० वर्ष अन्याय झाला आहे. या समाजाने खूप दिवस अन्याय सहन केला. मराठवाड्यात काय करायचे आणि कोणते पुरावे ग्राहय धरायचे ते धरा. सर्व मराठ्यांना आरक्षण द्या, असे सरकारला ठणकावून सांगितले आहे. मराठवाड्यातील मराठ्यांनी टेन्शन फ्री राहा, नोंदी सापडल्या नाही तरी सर्वांना आरक्षण मिळाल्या शिवाय मी मागे हटणार नाही, असे जरांगे म्हणाले.

ओबीसींच्या वतीने एक फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन केली जाणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, लोकशाहीने सर्वांनाच आंदोलन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांनी आंदोलन करावें व आमचं काही म्हणणं नाही. त्यासाठी माझी थोडीच परवानगी लागणार आहे, असा खोचक टोला जरांगे यांनी ओबीसी नेत्यांना लगावला.

हेही वाचा 

Back to top button