नांदेड: यळकोट यळकोट जय मल्‍हारच्या जयघोषात माळेगाव यात्रेला सुरुवात | पुढारी

नांदेड: यळकोट यळकोट जय मल्‍हारच्या जयघोषात माळेगाव यात्रेला सुरुवात

नागनाथ पुरी

माळाकोळी : उत्‍तम जागा पाहूनी मल्‍हारी देव नांदे गड जेजुरी … अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्‍हार म्‍हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपरिक पध्‍दतीने यंदाही माळेगावच्‍या श्रीखंडोबा रायाच्‍या यात्रेला सुरूवात झाली. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्‍या व मानक-यांच्‍या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने मानाचा फेटा, शाल श्रीफळ व मानधन देवून स्‍वागत करण्‍यात आले.

प्रारंभी सकाळी शासकीय पूजा करण्‍यात आली. त्‍यानंतर दुपारी पालखी पुजनानंतर देव स्‍वारी काढण्‍यात आली. यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ संतोष तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव मंजूषा कापसे, नारायण मिसाळ, रेखा काळम-कदम, अमित राठोड, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणिताताई देवरे- चिखलीकर, चंद्रसेन पाटील, पुरुषोत्तम धोंडगे, व्ही.आर. बेतीवार, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बोधनकर, रोहित शिंदे, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार लाड, गट विकास अधिकारी अडेराघो आदींची उपस्थिती होती.

मानक-यांचा गौरव

पालखीचे मानकरी गणपतराव मल्‍हारी नाईक (रिसनगाव), गोविंदराव नागेशराव महाराज (कुरुळा), व्‍यंकटराव मारोतीराव पांडागळे (शिराढोण), खुशाल भगवानराव भोसीकर (पानभोसी), गोविंदराव बाबाराव नाईकवाडे (पानभोसी), पांडुरंग नारायणराव पाटील (माळेगाव), मल्‍हारी रावसाहेब पाटील (माळेगाव), विजयकुमार शंकरराव कनकंदडे (आष्टुर) या मानक-यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने फेटा बांधून गौरव करण्‍यात आला.

खंडोबा यात्रेत वाघ्‍या-मुरळी

उत्‍तम जागा पाहुनी मल्‍हारी देव नांदे गड जेजुरी उत्‍तराची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी… असा घोष करत वाघ्‍या मुरळी खंडोबाची सेवा करते. पारंपरिक पध्‍दतीने कवडयाच्‍या माळी, लांब हळदीचा मळभट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्‍या मुरळी खंडोबाची सेवा करत असते. या वाघ्‍या मुरळीला पाहण्‍यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button