छ. संभाजीनगर : पोलीस बंदोबस्तात नाथसागर धरणात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू | पुढारी

छ. संभाजीनगर : पोलीस बंदोबस्तात नाथसागर धरणात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू

चंद्रकांत अंबिलवादे

पैठण: मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयासह आंदोलनाचा लढा देणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पैठण येथील नाथसागर धरणात भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर पूर्ण झाली आहे. यासाठी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी किरण सावंत यांनी धरण परिसरात दि. ४ डिसेंबरपर्यंत जमाबंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती पाणी नियंत्रण समितीचे प्रमुख कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली आहे.

पैठण येथील नाथसागर धरणामध्ये यावर्षी अपेक्षापेक्षा पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील सिंचनासह औद्योगिक आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न उग्ररूप धारण करणार आहे. त्यासाठी नाथसागर धरणाच्या वरील भागातून मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, अहमदनगर, नाशिक येथील लोकप्रतिनिधींसह कारखानदारांनी विरोध दर्शवून न्यायालयात धाव घेतली होता. परंतु, न्यायालयाने काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री अनिल पटेल, राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी दाखल केलेला दावा विचारात घेऊन वरील धरणातून तत्काळ पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निकाल दिला आहे.

त्यामुळे गुरुवारी (दि.२४) श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी किरण सावंत यांनी भंडारदरा, निळवंडे धरणातून नाथसागर धरणात प्रवरा नदीच्या सांडव्याद्वारे पाणी सोडण्याची प्रशासकीय स्तरावर तयारी पूर्ण केली. या पार्श्वभूमीवर प्रवरा नदीवरील राहुरी तालुक्यातील रामपुरी, केसापुरी या कोल्हापुरी बंधारा तर श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे, गळनिंब, वळदगाव, पेढगाव, मालुंजा, भेर्डापुर, वांगी, खानापूर व कमलापूर या परिसरात प्रतिबंधकत्मक जमाबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश दि.४ डिसेंबर पर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत लागू राहणार आहे.

काही नागरिकांकडून कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये फळ्या टाकून (लोखंडी गेट) पाणी अडवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नाही. यासाठी पाटबंधारे विभागाचे पाणी नियंत्रण प्रमुख कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी पैठण, शेवगाव श्रीरामपूर पोलिसांना पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वरील धरणातून पाण्याचा प्रवाह सुरू असताना या ठिकाणी व आजूबाजूस ५०० मीटरपर्यंत नागरिकांना जमाव करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

केवळ नगर, पैठण पाटबंधारे विभागाचे नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी व शासकीय वाहन यांना प्रवेश राहणार आहे. दरम्यान, शनिवारी (दि.२५) सकाळपासून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

Back to top button