मराठा आरक्षणासाठी कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये : मनोज जरांगे- पाटील यांचे आवाहन | पुढारी

मराठा आरक्षणासाठी कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये : मनोज जरांगे- पाटील यांचे आवाहन

वाशी, पुढारी वृत्तसेवा: मराठ्यांच्या घरात कुणबी प्रमाणपत्र आल्याशिवाय एक इंच पण जरांगे- पाटील मागे हटणार नाही, मी मराठ्यांशी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही. तुम्ही एकच करा की, एकाने पण टोकाचे पाऊल उचलू नका, आंदोलनात उद्रेक करू नका, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर सभेत केले. (Manoj Jarange-Patil)

धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे मनोज जरांगे- पाटील यांची तिसऱ्या टप्यातील जाहीर सभा झाली. वाशी शहरातील माळी समाजाच्या वतीने २ टन फुलांच्या हाराने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मराठा समाजाच्या वतीने १०० जेसीबीच्या साह्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच वाशी सकल मराठा बांधवच्या वतीने प्रशांत चेडे व सुरेश कवडे यांच्या हास्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. (Manoj Jarange-Patil)

यावेळी जरांगे – पाटील म्हणाले की, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून ५० टक्के च्या आत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे. येथून पुढील काळात इलेक्शन नाही, फक्त आरक्षणासाठी सगळ्या मराठ्यांना लढायाचे आहे. स्वतःच्या पोराचा व घरा -घरातील लेकरांचा यात फायदा होणार आहे. गावा- गावांतील मराठयांना सांगतो की, सरकारने माझ्याकडून आरक्षण देण्यासाठी वेळ घेतली आहे. जर आरक्षण दिले नाही, तर सर्व मराठ्यांनी २४ डिसेंबरपासून तितक्याच ताकदीने, आणि तितक्याच जोमाने साखळी उपोषण गावा- गावांत करावयाचे आहे.

गरज पडली, तर सर्वांनी मुंबई जाऊन मंत्रालय गाठायचे आहे. आम्ही आमच्या जेवणाची व खाण्या – पिण्याची व्यवस्था करतो, पण सरकारने आमची शौचालयाची व्यवस्था करावी, असे यावेळी त्यांनी सरकारला आवाहन केले. आम्ही आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही. मुंबई गाठण्यासाठी सव्वा दोन कोटींची नोंद आतापर्यत माझ्याकडे झालेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आपल्या बाजूला धनगर, बौद्ध, माळी, मुस्लिम आदी समाज येत आहे. आपण त्यांच्या पाठीशी उभे राहतो, तर ते आपल्या पाठीशी का उभे राहणार नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा  

Back to top button