Beed News: मातोरी येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी | पुढारी

Beed News: मातोरी येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी

धर्मराज जरांगे

मातोरी: पुढारी वृत्तसेवा : मातोरी येथे दरोड्याचा प्रयत्न फसला. परंतु दरोडेखोरांच्या हल्ल्यात दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.१२) पहाटे ४ च्या सुमारास घडली. रमेश नारायण गायकवाड (रा. बस स्टँडजवळ, मातोरी) असे जखमीचे नाव आहे. त्यांना बीड येथील सरकारी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चकलंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Beed News

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण- विशाखापट्टणम रस्त्यावरील बस स्टँडजवळ रमेश गायकवाड राहतात. आज पहाटे २ मोटारसायकलवरून आलेल्या ४ दरोडेखोरांनी गायकवाड यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे दोन लॉक तोडून वरच्या मजल्यावर प्रवेश केला. परंतु तेथे गायकवाड यांच्या दोन मुली झोपलेल्या होत्या. त्यामुळे दरोडेखोर खाली आले. आणि तेथील खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दरम्यान, आवाजामुळे गायकवाड आणि त्यांची पत्नी जागे झालेत. त्यामुळे दरोडेखोर आणि रमेश यांच्यामध्ये झटापट झाली. दरोडेखोराने कुऱ्हाडीने गायकवाड यांच्यावर वार केला. परंतु, तो त्यांनी चुकविल्याने कपाटावर लागला. परंतु दुसरा वार त्यांच्या डोक्यावर तसेच डोळ्याच्या बाजूला लागला. वार खोलवर लागल्याने १२ ते १५ टाके पडले आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. Beed News

दरम्यान, त्यांच्या मुलाने आरडाओरड गेल्याने शेजारी पाजारी जागे झाले. त्यामुळे दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. नंतर नागरिकांनी गायकवाड आणि त्यांच्या पत्नीला बीड येथे सरकारी रूग्णालयामध्ये दाखल केले. सकाळी ८ वाजता चकलंबा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मातोरी आणि परिसरामध्ये अशा घटना अनेक वेळा घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी परिसरामध्ये पोलीस गस्त वाढवून दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.

हेही वाचा 

Back to top button