छगन भुजबळांचा सरसकट मराठा आरक्षणाला विरोध; मराठ्यांचे ‘बॅक डोअर’ने ओबीसीकरण सुरु असल्याचा दावा | पुढारी

छगन भुजबळांचा सरसकट मराठा आरक्षणाला विरोध; मराठ्यांचे 'बॅक डोअर'ने ओबीसीकरण सुरु असल्याचा दावा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात मराठ्यांना अवैधपणे कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरु असून मराठ्यांचे बॅक डोअरने ओबीसीकरण केले जात आहे. राज्यात ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे हे षडयंत्र आहे, असा सनासनाटी आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. मराठा आरक्षणाला आमचा कधीही विरोध नाही किंवा नव्हता, पण त्यांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यास आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास विरोध आहे, असेही भुजबळ म्हणाले. बीड जिल्ह्यातील जाळपोळीची पाहणी करून आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी (दि. ६) पत्रकारांशी ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले,  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु असताना माजलगाव आणि बीडमध्ये आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, समता परिषदेचे सुभाष राऊत यांची घरे, हॉटेल्स आणि कार्यालये टार्गेट करून फोडण्यात आली. जाळपोळ केली. यात कोट्यवधींचे नुकसान झाले.

मराठा आरक्षणाला मी, माझ्या पक्षाने, माझ्या समता परिषदेने कधीही विरोध केला नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, अशी भूमिका मी सुरुवातीपासून घेतली. हीच भूमिका शरद पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

राज्यात ओबीसींची संख्या ५४ टक्क्यांहून अधिक आहे. त्यांना २७ टक्के आरक्षण आहे. ओबीसींमध्ये ३७५ जातींचा समावेश आहे. या गोरगरिब समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, पण राज्यात सध्या दहशत निर्माण करून आमदारांची घरे जाळली जात आहेत. हल्ले करायचे असतील तर तुम्हाला हा सावधानतेचा इशारा आहे, असे समजावे. सगळ्या घटकाने आपला आक्रोश मांडला पाहिजे. आम्ही बोललो तर आमच्या जीवावर उठणाऱ्या शक्तीचा शोध घ्यायला हवा. सभेला जमीनी देणाऱ्यांना सरकारने मदत दिली. आता ज्यांची घरे जाळली त्यांना सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली.

ओबीसींची जनगणना करा

राज्यात ओबीसींची जनगणना करावी, अशी आग्रही मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. बिहारमध्ये ही जनगणना केल्यावर ६३ टक्के ओबीसी आढळले. महाराष्ट्रातही हा आकडा ५४ टक्क्यांहून अधिक आहे. त्यापेक्षा हा आकडा कधीही कमी होणार नाही, असे भुजबळ म्हणाले. राज्यात मराठा समाजाला बेकायदेशीरपणे कुणबी प्रमाणपत्र वाटप केले जात आहे. पाच हजार पुराव्यांचे कधी १३ हजार झाले हा संशोधनाचा विषय आहे. आता तर प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाची दुकाने उघडली आहेत. मनोज जरांगेंना त्यांच्या लेकरा-बाळांचे पडले आहे, जी घरे जाळली त्या घरातही लेकरं-बाळं राहतात. त्यांना तेथील लेकरं-बाळं दिसली नाहीत का? असा सवालही भुजबळ यांनी केला.

हेही वाचलंत का?

Back to top button