जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण संदर्भात १४ ऑक्टोबररोजी मनोज जरांगे- पाटील यांची अंतरवाली सराटीत विराट सभा झाली होती. मराठा समाज बांधवाच्या अंतरवाली सराटी येथील महासभेसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मराठा बांधवानाकडून रब्बीसाठी बियाणे वाटप करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांची विराट सभा झाली होती. या सभेसाठी १७० एकर जागा परिसरातील शेतकऱ्यांनी दिली होती. त्यासाठी आपल्या शेतात सोयाबीन, कपाशीसह लावलेली पिके शेतकऱ्यांंनी उपटून सभेसाठी मैदान तयार करून दिले होते. पीक उपटून फेकताना त्यांनी कुठलाच विचार केला नाही. या सभेला लाखोच्या संख्येने आलेल्या जनतेने सोयाबीन, कपाशीचे उभे पीक तुडवून सभेची जागा गाठली. सभा तर निर्विघ्न पार पडली. पण गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांचे हातचे पीक गेले होते.
त्यामुळे घनसावंगी तालुक्याच्या गुंज येथील शेतकरी गजानन साळीकराम तौर यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दहा क्विंटल गहू बियाणे व २१ बॅग सरकी पेंड शेतकऱ्यांना दिली. तसेच रब्बीच्या पेरणीसाठी १० क्विंटल गहू बियाणे, व बैलांसाठी २१ बॅग पेंड स्थानिक कमिटीकडे जमा करण्यात आली. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांच्यामार्फत ही मदत दिली जाणार आहे. आपणही समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून तौर यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. मराठा बांधवांची हे दातृत्व वाखाणण्याजोगे आहे. परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे.