Tuljabhavani Devi : तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा | पुढारी

Tuljabhavani Devi : तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा

धाराशिव; पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी (दि. २०) सातव्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली.

श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्म रक्षणासाठी श्री.तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देऊन आर्शीर्वाद दिला म्हणून या दिवशी श्रींस महाअलंकार घालण्यात येऊन छत्रपती भवानी तलवार देत असल्याची अवतार पूजा मांडण्यात येते. दरम्यान,काल रात्री श्री. देवीजींची छबिना मिरवणूक सिंह वाहनावरुन काढण्यात आली. शनिवारी (दि. २२) तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे.

तुळजापूर शहरात भाविकांची गर्दी उसळली असून प्रशासनानेही अनेक उपाययोजना केल्याने गर्दी विभागली गेली आहे. त्यामुळे दर्शनासाठी भाविक ताटकळ्याचे चित्र अभावानेच दिसत आहे. या गर्दीचा गैरफायदा मात्र अनेक छोट्या व्यवसायिकांनी घेतला आहे. रिक्षा चालकांनी भरमसाठ दर वाढविले असून काही तापरिचालकांनी चहा, नाश्ता आदींचे दर वाढविले आहेत.

Back to top button