Dnyanradha Multistate Bank Beed: ‘ज्ञानराधा’च्या ठेवीदारांची कोंडी ? | पुढारी

Dnyanradha Multistate Bank Beed: 'ज्ञानराधा'च्या ठेवीदारांची कोंडी ?

श्रीपाद कुलकर्णी

सेलू :
बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. आणि सेलू येथील मोंढा परिसरातील शाखेत गुरुवारी (दि. १२) रात्रीपासून शुक्रवारी (दि. १३) रात्रीपर्यंत ठेवीदारांनी एकच गर्दी केली होती. मात्र, ज्ञानराधाच्या व्यवस्थापनाने ठेवीदारांची रोख रक्कम रोखीने न देता ऑनलाइन पद्धतीने इतर बँक खात्यात वर्ग करावी लागेल, असे सुचित केल्यामुळे मोठ्या ठेवीदारांची कोंडी झाली आहे. तर बँक कोणत्याही अडचणीत आलेली नाही, ठेवीदारांनी ठेवी परत घेऊ नयेत. हे ठेवीदारांना समजावून सांगताना बँक व्यवस्थापनाची दमछाक झाली. बँक व्यवस्थापनाने शनिवारी सेलू येथील शाखा सुरू ठेवली. तरीदेखील बँकेत मोजकेच ठेवेदार आढळून आले. (Dnyanradha Multistate Bank Beed)

650 ठेवीदारांचे 30 कोटी

ज्ञानराधा मल्टीस्टेट शाखेत एकूण 650 ठेवीदारांचे 30 कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. सदिल ठेवी या मागील सहा वर्षांपासून जमा आहेत. कमीत कमी 25 हजारांपासून ते जास्तीत जास्त 25 लाखांपर्यंतच्या ठेवी जमा असल्याची माहिती बँक व्यवस्थापकाने दिली. (Dnyanradha Multistate Bank Beed)

पहिल्याच दिवशी एक कोटी परत

ज्ञानराधा सेलू शाखेत पहिले दोन दिवस ठेवीदारांनी गर्दी करून ठेवी परत मागितल्यानंतर, पहिल्या दिवशी एक ते दीड कोटी रुपयांच्या ठेवी परत करण्यात आल्याची माहिती बँक व्यवस्थापनाने दिली आहे. तसेच सर्व ठेवी, ठेवीदारांच्या इतर बँक खात्यात आरटीजीएस म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने ठेवू परत करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. तर कोणत्याही ठेवीदाराला रोखीने ठेवी परत देणार नसल्याची माहिती देखील बँक व्यवस्थापकाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या ठेवीदारांची चांगलीच कोंडी झाली आहे. बँकेतून ठेवी परत घेतल्या नाही तर बँक बुडण्याची भीती. आणि आरटीजीएस मार्फत ठेवी परत घेतल्या तर, आयकरसह सरकारी यंत्रणांची भीती. त्यामुळे कोंडीत सापडलेले मोठे ठेवीदार यांची सद्यस्थितीत चांगली पंचायत झाली असल्याचे चित्र बँकेसमोरील ओसरलेल्या गर्दीवरून स्पष्ट होते.

Dnyanradha Multistate Bank Beed : 19 कोटी कर्जवाटप

ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या सेलू शाखेतून 16 टक्के व्याज दराने 19 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यात अडीच कोटी रुपये सोनेतारण रुपाने वाटप केले असून याचा व्याजदर 15 टक्के इतका असल्याची माहिती मिळते .ठेवीदारांना मुदती ठेवनुसार व्याज दिले जाते. ते असे की ,एक महिन्यासाठी सात टक्के, दोन महिन्यासाठी 8 टक्के, सहा महिन्यासाठी १० टक्के, बारा महिन्यासाठी 12 टक्के, तर पाच वर्षासाठी सर्वाधिक 13 टक्के दराने व्याज ठेवीदारांना देण्यात येते. पैशाची गोपनीयता व व्याजदर चांगला आहे, म्हणून ठेवीदारांचा ठेवी जमा करण्यासाठी या बँकेकडे ओघ निर्माण झाला होता .

Dnyanradha Multistate Bank Beed : ठेवीदारांना प्रतीक्षाच

ज्ञानराधा बँकेच्या 650 ठेवीदारांनी मागील सहा वर्षापासून मुदती ठेवी जमा केलेल्या आहेत. त्यातून 19 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे आजच सर्व ठेवीदारांनी ठेवी परत मागितल्यास बँक व्यवस्थापनासाठी तत्काळ सर्व ठेवी परत करणे कसोटीचे ठरणार आहे. म्हणून ते परत मिळण्यासाठी ठेवीदारांना बँकेकडे दीर्घ प्रतीक्षाच करावी लागेल, अशीच परिस्थिती असल्याची माहिती मिळते.

Dnyanradha Multistate Bank Beed : २५ टक्के ठेवीदारांचे समाधान – आर. बी. चाळक

ज्ञानराधा बँकेबाबत अफवा पसरताच मागील दोन दिवसांत ठेवीदारांनी बँकेत मोठी गर्दी केली होती. एवढेच नव्हे तर सर्वच ठेवी परत द्या, असाच आग्रह ठेवीदार करत होते. मात्र, बँक कोणत्याही आर्थिक अडचणीत आलेली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत, असे सांगितल्यावर 25 टक्के ठेवीदारांचे समाधान झाले असल्याची माहिती येथील शाखा व्यवस्थापक आर. बी. चाळक यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना दिली. ते म्हणाले की, मुदत पूर्ण झालेल्या ठेवी परत देण्यास कोणतीच अडचण नाही. तसेच सर्व ठेवी रोखीने परत देणे शक्य नाही. त्यामुळे आरटीजीएसने परत करता येतील .शनिवारी सुट्टी असून देखील शाखा सुरू ठेवलेली आहे. वरिष्ठांनी सांगितले तर रविवारीदेखील शाखा सुरू ठेवण्यात येईल, असेही चाळक यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button