हिंगोली : दहा हजाराची लाच घेताना पालक तांत्रिक अधिकारी एलसीबीच्या जाळ्यात | पुढारी

हिंगोली : दहा हजाराची लाच घेताना पालक तांत्रिक अधिकारी एलसीबीच्या जाळ्यात

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या हमी योजना कार्यालयातील पालक तांत्रिक अधिकारी जे. एम. पठाण यांना 10 हजार रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. ३०) सायंकाळी रंगेहाथ पकडले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीच्या चौथ्या हप्त्याचा कुशल निधी देण्यासाठी ही रक्कम त्यांनी घेतली.

शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे बांधकाम केले होते. या विहिरीचा कुशल कामाचा चौथा हप्ता देण्यासाठी पालक तांत्रिक अधिकारी जे. एम. पठाण यांनी दोन शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. सदर रक्कम आज देण्याचे ठरले होते.

मात्र तक्रारदाराने यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यावरून उपाधीक्षक अनिल कटके, पोलिसनिरीक्षक प्रफुल अंकुशकर, विनायक जाधव सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनूस, विजय शुक्ला जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, तान्हाजी मुंडे, गजानन पवार, गोविंद शिंदे, राजाराम फुफाटे, शिवाजी वाघ, शेख अकबर यांच्या पथकाने सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती परिसरात सापळा रचला होता. यावेळी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयाची लाच घेताना पठाण यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button