कोल्हापूर : शेतकरी आत्महत्यांमध्ये हवामान बदल हा एक रिस्क फॅक्टर आहे. यासंबंधी विविध अभ्यास समोर येत असून, त्यातील एका अभ्यासात महाराष्ट्रातील 13 तर मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे नमूद केलेले आहे. टंचाईच्या समस्येवर उपाय शोधताना हे अभ्यास अहवाल महत्त्वाचे आहेत. मराठवाड्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे यातून दिसून येत आहे. (Climate Change Risk)
पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत
हवामान बदलाचा शेतकरी आत्महत्येशी काही संबंध आहे का? हवामान बदलाचा शेतीवर कसा परिणाम होईल? देशाच्या कोणत्या भागात हवामान बदल कसा प्रभाव टाकेल, याचा अभ्यास विविध संस्था आणि संशोधक करत आहेत. लंडनस्थित 'द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट (आयआयईडी)' या संस्थेने मे महिन्यात एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला होता. Urgent Preventative Action for Climate-related Suicides in Rural India खपवळर या पेपरमध्ये हवामान बदल आणि शेतकरी आत्महत्या यांच्यात थेट संबंध असल्याचे म्हटले आहे.
2014 ते 2021 या काळातील शेतकरी आत्महत्या आणि पावसातील बदल यांचा अभ्यास केल्यानंतर ज्या वर्षी दुष्काळीस्थिती असते, त्या वर्षी जास्त शेतकरी आत्महत्या झाल्याचे यात नोंदवण्यात आले आहे. या पेपरमध्ये देशातील पाच राज्यांचा अभ्यास यात करण्यात आलेला आहे. शिवाय ज्या राज्यांत शेतकर्यांना रोजगार हमीसारख्या योजनांचा लाभ घेता आला नाही, तेथेही शेतकरी आत्महत्या जास्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आयआयईडीच्या भारतातील प्रकल्प समन्वयक ईरा देऊळगावकर म्हणाल्या, लहरी पाऊस आणि जोडीने सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा अभाव यामुळे लहान भूधारक शेतकरी आणि शेतमजुरांची जोखीम हवामान बदलामुळे अधिकच वाढत आहे.
केंद्र सरकारच्या अखत्यारित 'द सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायलँड अॅग्रिकल्चर' ही संस्था कार्यरत आहे. 2019ला या संस्थेने Risk and Vulnerability Assessment of Indian Agriculture to Climate Change हा अहवाल प्रसिद्ध केला होता. भारतासारख्या उद्योन्मुख अर्थव्यवस्थांवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम होईल, असे या अहवालात म्हटले आहे. शिवाय हवामान बदल हा शाश्वत शेतीसाठी फार मोठा धोका असेही या अहवालात नमूद म्हटले आहे. या अहवालात देशातील 22 जिल्ह्यांना अतिधोका तर 171 जिल्ह्यांना धोका आहे, असे नमूद केले आहे. या यादीत महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांचा समावेश आहे, यातील 7 जिल्हे मराठवाड्यातील आहेत.
2021मध्ये 'नॅशनल डेअरी इन्स्टिट्यूटचे चैतन्य आढाव आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हीट अँड बारली रिसर्च'चे संशोधक डॉ. आर. सेंधील यांनी हवामान बदल आणि शेती यावर संशोधन केले आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना हवामान बदलाचा धोका असल्याचे म्हटले आहे. याशिवाय ज्वारी, भात, गहू, ऊस आणि कापूस या पिकांवर हवामान बदलाचा मोठा फटका बसण्याची भीती या संशोधनातून व्यक्त करण्यात आली आहे.
आढाव सध्या उत्तराखंड येथील 'जी. बी. पंत युनिर्व्हसिटी ऑफ अॅग्रीकल्चर अँड टेक्नॉलॉजी'मध्ये कार्यरत आहेत. ते म्हणाले, शेतकरी आत्महत्यांमागे विविध कारणे आहेत, त्यांना आपण रिस्क फॅक्टर म्हणतो. हवामान बदल हा त्यातीलच एक रिस्क फॅक्टर आहे. यावर अधिक संशोधन होण्यासाठी पुरेशी आकडेवारी मिळत नाही, ही मोठी समस्या आहे. (Climate Change Risk)
अशा स्थितीत शेतकर्यांना मदत करण्यासाठी आगाऊ स्वरूपाच्या उपाययोजना (Anticipatory Measures) आवश्यक ठरतात. देऊळगावकर म्हणाल्या, महाराष्ट्रातील बर्याच भागांत या वर्षी पाऊस कमी झाला आहे, अशी सध्याची तरी स्थिती आहे. अशी स्थिती असेल शेतकर्यांना याची झळ कमीतकमी बसावी या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. समजा, जून महिन्यात पाऊस कमी पडणार असा अंदाज असेल, तर सरकारने शेतकर्यांना त्याबद्दल अवगत केले पाहिजे आणि लागवड जूनमध्ये न करता ती पुढे ढकलली पाहिजे, जेणे करून शेतकर्यांचे संभाव्य नुकसान टळू शकेल.
(इनपूट – सुहास चिद्रवार, गौतम बचुटे (बीड), अमोल मोरे (छत्रपती संभाजीनगर)