नांदेड जिल्ह्यातील मोटारसायकल चोरांना लातुरात अटक

लातूर; पुढारी वृतसेवा : मोटारसायकली चोरणाऱ्या तीघांना 12 मोटरसायकलीसह येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. नागेश हनुमंत मोरे (वय 26), नवजीवन गणपती सोनटक्के (वय 27), श्रीवर्धन आनंद सोनकांबळे, (वय 20 वर्ष) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण नांदेड जिल्ह्यातील पानशेवडी गावचे रहिवाशी आहेत. त्याच्याकडून 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीचा तपास विशेष पथके करीत होती. दरम्यान विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकास विवेकानंद चौक येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बाभळगाव चौक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. पथक तातडीने तिथे रवाना झाले व त्यांनी उपरोक्त संशयीतांना ताब्यात घेऊन विचारपूस केली.
काही दिवसांपूर्वी लातूर शहरातील विश्वसागरसिटी, कातपूर रोड येथून दोन मोटारसायकल चोरी केल्या असून त्या लपवून ठेवल्याचे तसेच त्यांनी लातूर व नांदेड जिल्ह्यातून अनेक मोटार सायकली चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून लातूर व नांदेड जिल्ह्यातून त्यांनी चोरलेल्या 12 मोटरसायकल जप्त करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस अमलदार श्याम दुड्डे हे करीत आहेत.